अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास* पोक्सो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांचा प्रभावी युक्तिवाद

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास
* पोक्सो न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांचा प्रभावी युक्तिवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)                   अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या गंभीर प्रकरणात बुलढाणा येथील विशेष पोक्सो न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. देऊळघाट येथील सतिष शंकर खंडारे याला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालय-३ तथा विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी आज ३१ ऑक्टोबर रोजी हा निकाल दिला. विशेष सरकारी वकील अॅड. संतोष मुलचंद खत्री यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि पीडिता व तिच्या आईची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली.

* घरी कोणी नसताना अत्याचार; धमकी देऊन वारंवार शोषण
         अभियोजन पक्षाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार ३ एप्रिल २०२१ रोजी रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसताना आरोपीने १५ वर्षीय पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच, याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही आरोपीने वारंवार पीडितेवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. काही दिवसांनी आईने विचारपूस केल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

* पोलिसांचा तपास; १० साक्षीदारांची साक्ष
         या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे संकलित करून आरोपीविरुद्ध विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
      न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. संतोष मुलचंद खत्री यांनी बाजू मांडली. या खटल्यात एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अन्य साक्षीदारांच्या साक्षी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे सरकारी पक्षाने आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी युक्तिवाद केला.

* पोक्सो कायद्यांतर्गत २० वर्षांची शिक्षा
        दोन्ही बाजूंचे युक्तिवाद तसेच साक्षी-पुराव्यांचे अवलोकन केल्यानंतर विशेष न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी आरोपी सतिष शंकर खंडारे याला दोषी ठरविले. पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, तर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ अंतर्गत एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
पोक्सो कायद्यांतर्गत विशेष शिक्षा सुनावण्यात आल्याने अन्य कलमांखालील शिक्षा स्वतंत्रपणे भोगण्याची आवश्यकता नसून सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
     या खटल्यात विशेष सरकारी वकील अॅड. संतोष मुलचंद खत्री यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी तपासाची जबाबदारी पार पाडली, तर न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार शेखर थोरात यांनी सहकार्य केले.