* शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा तालुक्यातील धाड ते जामठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पुढे हा रस्ता गिरडा मार्गे थेट मलकापूर पर्यंत जातो. धाड ते जामठी या रस्त्यावर जवळपास आठ ते दहा किलोमीटर अंतरात रस्त्यामध्ये पडलेले खड्डे अपघात वाढवत आहेत. जीवित हानी देखील झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख जालिंदर बुधात यांनी दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री जितेंद्र काळे यांची आज भेट घेऊन या संदर्भात रीतसर निवेदन देण्यात आले. धाड–जामठी–दहीद फाटा या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता नागरिक, वाहनचालक व शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तात्काळ या रस्त्याची सुधारणा होऊन दळणवळणाच्या सुविधेला प्रशस्त करण्यात यावे. अन्यथा शिवसेनेच्या वतीने धाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, बुलढाणा तालुका प्रमुख विजय इतवारे, किसान सेना उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे उपस्थित होते.
