प्रतापराव जाधव यांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा होणार!
* होर्डिंग व डिजिटल बॅनर टाळून सामाजिक उपक्रम राबविण्याचे शिवसैनिकांना आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेता, केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांचा २५ नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस यंदा ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त होर्डिंग व डिजिटल बॅनर न लावता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा अनावश्यक खर्च व जाहिरातबाजी टाळून गरजू नागरिकांच्या सेवेला प्राधान्य देण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे.
जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश होण्यासाठी त्यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रकल्पांमधील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन अतिरिक्त जलसाठा खरीप पिकांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
सेवा सप्ताहादरम्यान शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, आरोग्य तपासणी व महाआरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दिव्यांगांना साहित्य वाटप आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
याशिवाय ‘जिना सिखो’ उपक्रमांतर्गत आयुर्वेदिक शिबिरे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, स्ट्रीट फूड विक्रेते व बचत गटातील महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
‘रेबीज फ्री सिटी’ अभियानाचा प्रारंभ, रोबोटिक सर्जरी युनिट सुविधा, एनएबीएल कार्यशाळा, टू-डी इको शिबिर आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.
दिखाव्यापेक्षा सेवेला प्राधान्य
जिल्ह्यातील स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध भागांत या उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी, गरजू नागरिक आणि वंचित घटकांना दिलासा देणे, हा सेवा सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी होर्डिंग व डिजिटल बॅनर न लावता प्रत्यक्ष समाजोपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस सेवाभावी पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
