मलकापुरातून रविकांत तुपकरांच्या ‘दुष्काळ संघर्ष’ यात्रेचा शंखनाद!* हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ; शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन, वीरपत्नी सुषमाताईंच्या हस्ते हिरवी झेंडी* ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चाचे आवाहन

मलकापुरातून रविकांत तुपकरांच्या ‘दुष्काळ संघर्ष’ यात्रेचा शंखनाद!
* हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रेला प्रारंभ; शहीद संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन, वीरपत्नी सुषमाताईंच्या हस्ते हिरवी झेंडी
* ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चाचे आवाहन
मलकापूर : (एशिया मंच न्यूज )
       दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीनांच्या न्याय्य हक्कांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील बहुचर्चित ‘दुष्काळ संघर्ष’ यात्रेला १४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत  सुरुवात झाली. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन करून वीरपत्नी सुषमाताई राजपूत यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

* सरकारवर तुपकरांचा  हल्लाबोल!
           प्रारंभीच्या सभेत बोलताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण धोरणावर जोरदार टीका केली. “शेतकरी आणि सैनिक आहेत म्हणून हा देश जिवंत आहे. मात्र, आज शेतकरी आणि जवान दोघेही संकटांचा सामना करीत आहेत. दुष्काळाची चाहूल सरकारला वर्षभर आधी होती, तर मग वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत? शेतकऱ्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर का आणून ठेवले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“आता घरात बसून न्याय मिळणार नाही. शेतकऱ्यांनी एकजुटीने रस्त्यावर उतरावे. सरकारच्या नरडीवर पाय देऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय थांबणार नाही,” असा आक्रमक निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

* पाच हजारांची मदत अमान्य; हेक्टरी एक लाखांची मागणी
         राज्य सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर तुपकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी होते का? सोयाबीन उत्पादनासाठी एकरी लाख रुपयांपर्यंत खर्च होत असताना शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. त्यासाठी क्षेत्राची कोणतीही मर्यादा ठेवू नये. शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांनाही प्रत्येकी एक लाख रुपये मदत मिळाली पाहिजे,” अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.

* सोयाबीनला १२ हजार, कापसाला १७ हजारांचा भाव द्या!
       सोयाबीन व कापसाच्या घसरलेल्या दरावरून केंद्र सरकारलाही त्यांनी लक्ष्य केले. सोयाबीनला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव द्यावा, सोयापेंड आयातीऐवजी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, कापसावरील आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय मागे घेऊन ते ३० टक्के करावे आणि कापसाला प्रतिक्विंटल १७ हजार रुपये भाव द्यावा, अशा मागण्या त्यांनी मांडल्या.

* कर्जवसुली थांबवा; सरसकट कर्जमाफी करा
      दुष्काळी परिस्थितीत खासगी फायनान्स कंपन्या, मायक्रोफायनान्स संस्था, बँका आणि पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडील कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी तुपकरांनी केली. शेतकऱ्यांचा अपमान किंवा जबरदस्तीची वसुली सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सरकारने फायनान्स कंपन्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, शेतकऱ्यांचे सिबिल खराब होऊ देऊ नये आणि सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
याशिवाय तीन वर्षांपासून प्रलंबित पीकविमा मंजूर करणे, महिला बचतगटांचे कर्ज माफ करणे, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करणे, जनावरांसाठी थेट शेतकऱ्यांच्या दावणीला चारा उपलब्ध करून देणे आणि दुष्काळग्रस्त भागातील पाणीप्रश्न सोडविणे या मागण्याही त्यांनी मांडल्या.
     शहीद जवानाच्या स्मारकाला अभिवादन; वीरपत्नीला दिला शब्द
यात्रेच्या प्रारंभी तुपकरांनी शहीद जवान संजयसिंह राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी वीरपत्नी सुषमाताई राजपूत आणि त्यांचे पुत्र जय व शुभम उपस्थित होते. सुषमाताई यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ झाला. माजी सैनिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहीद जवानाचे मलकापूर येथे भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेण्याचा शब्द तुपकरांनी यावेळी दिला. नांगराचे पूजन करून सभास्थळापासून तहसील कार्यालयापर्यंत पायी रॅली काढण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकालाही अभिवादन करण्यात आले.
        
* ४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा!
       दुष्काळ संघर्ष यात्रेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतील गावागावांत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुष्काळग्रस्तांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अन्यथा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा तुपकरांनी दिला.
        ४ डिसेंबरला बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चात प्रत्येक गावातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. हा लढा केवळ मदतीसाठी नसून संपूर्ण गावगाडा वाचविण्यासाठी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
       या प्रारंभ सोहळ्याला वीरपत्नी सुषमाताई राजपूत, त्यांचे पुत्र जय व शुभम, ॲड. हरीश रावळ, ॲड. प्रवीण सुरडकर, डॉ. अप्पासाहेब कदम, बालू शर्मा, ईश्वर पाटील, भगवानराव मोरे, गजानन भोपळे, राजीव कसबे, ज्ञानेश्वर टाले, अमोल राऊत, सचिन शिंगोटे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, माजी सैनिक आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲड. प्रवीण सुरडकर यांनी वासुदेवाची भूमिका साकारून यात्रेत सहभाग नोंदविला.
शहीद जवानाला अभिवादन, वीरपत्नीच्या हस्ते हिरवी झेंडी आणि हजारो शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा वातावरणात मलकापुरातून सुरू झालेली ही दुष्काळ संघर्ष यात्रा आता जिल्ह्यातील गावागावांत पोहोचणार असून, ४ डिसेंबरच्या बुलढाणा येथील महामोर्चाच्या माध्यमातून या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे.