बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा शिवसैनिकांचा निर्धार!* बुलढाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; पदाधिकाऱ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा शिवसैनिकांचा निर्धार!
* बुलढाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने स्मृतिदिनानिमित्त अभिवादन; पदाधिकाऱ्यांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
         हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त बुलढाणा येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या नेतृत्वाचा, विचारांचा आणि संघर्षमय वाटचालीचा गौरव करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
       यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कुटुंबातील शिवसैनिकांना नेतृत्वाची संधी देत अनेकांना सत्तेच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले. त्यांच्या नेतृत्वामुळे असंख्य कार्यकर्त्यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचा आणि समाजकारणाचा वारसा प्रत्येक शिवसैनिकाने अधिक जोमाने पुढे नेण्याची गरज आहे.
      पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी आपल्या मनोगतातून बाळासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची ताकद त्यांनी शिवसैनिकांमध्ये निर्माण केली. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्या म्हणाल्या.
जिल्हा सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांनी संघटनात्मक बांधणीवर भर देत बाळासाहेबांचा '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हा मूलमंत्र तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. जिल्हा समन्वयक गजानन धांडे यांनी बाळासाहेबांच्या मार्गदर्शना खालील जुन्या आठवणींना उजाळा देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
        महिला आघाडी तालुकाप्रमुख अनिता जाधव यांनी बाळासाहेबांनी महिलांना सन्मानाने जगण्याचे बळ दिल्याचे सांगितले. महिला आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटनेचे कार्य अधिक व्यापक करून महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
        या अभिवादन सभेला उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, उपतालुकाप्रमुख भावना पाटील, शहर संपर्कप्रमुख सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, शाम सावळे, गजानन गवई, अरुण पाटील, श्रीकांत जाधव, निलेश हरकल, सोहिभाई, बबन खरे, मुंडे साहेब, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, रत्ना शेळके, सुनीता कदम, श्रद्धा दाभाडे, भारती भारंबे, स्वाती लोंभेकर, रूपाली चव्हाण यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          बाळासाहेबांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवत सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचा आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केला.