दुष्काळ संघर्ष यात्रा चिरडण्याचा सरकारचा कट; आम्ही मागे हटणार नाही! – रविकांत तुपकर* देवधाबा येथील सभेत सरकारवर गंभीर आरोप; ४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याचा इशारा

दुष्काळ संघर्ष यात्रा चिरडण्याचा सरकारचा कट; आम्ही मागे हटणार नाही!  – रविकांत तुपकर
* देवधाबा येथील सभेत सरकारवर गंभीर आरोप; ४ डिसेंबरला बुलढाण्यात शेतकऱ्यांची ताकद दाखवण्याचा इशारा
मलकापूर  :  (एशिया मंच न्यूज )
       शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सुरू झालेल्या दुष्काळ संघर्ष यात्रेला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र, ही यात्रा चिरडण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला. “आमच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली जात आहे. यात्रेत साध्या वेशातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेचे लोक फिरत आहेत. सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी देवधाबा येथील सभेत दिला.
१४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून दुष्काळ संघर्ष यात्रेला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. देवधाबा येथील सभेत तुपकरांनी सरकारच्या कथित दडपशाहीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आमचं पोलिसांशी भांडण नाही, पोलीस आपलेच भाऊ आहेत. मात्र, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.
शेतकरी, मेंढपाळांच्या प्रश्नांसाठी संघर्ष
दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असून सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा, दुष्काळग्रस्तांना नुकसानभरपाई आणि कर्जमाफी द्यावी, अशी मागणी तुपकरांनी केली. तसेच मेंढपाळांवरील आंतरजिल्हा चराई निर्बंध रद्द करावेत, २०१९ मधील अतिवृष्टीत मृत्युमुखी पडलेल्या शेळ्या-मेंढ्यांची नुकसानभरपाई द्यावी आणि पशुपालकांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

* ४ डिसेंबरला बुलढाण्यात एल्गार महामोर्चा
         दुष्काळ संघर्ष यात्रा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांतून मार्गक्रमण करणार असून, ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात यात्रेचा समारोप आणि एल्गार महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिजामाता प्रेक्षागृह परिसरात शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन तुपकरांनी केले. ४ डिसेंबरला बुलढाण्यात बळीराजाची ताकद सरकारला दाखवून देऊ. अभी तो शुरुआत है! शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष थांबणार नाही, असा आक्रमक इशारा त्यांनी दिला.
दुष्काळ संघर्ष यात्रेला पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद आणि तुपकरांच्या सरकारविरोधी आरोपांमुळे आगामी आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.