धरणासाठी जमिनी आमच्या, मग हक्काच्या पाण्यासाठी प्रतीक्षा कशाला? पेनटाकळी धरणावर हजारो शेतकऱ्यांचा एल्गार!* ‘तुम्ही पाणी सोडा, अन्यथा आम्ही सोडतो!’ आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रशासनाला इशारा; दोन दिवसांत बैठकीचे आश्वासन



धरणासाठी जमिनी आमच्या, मग हक्काच्या पाण्यासाठी प्रतीक्षा कशाला? पेनटाकळी धरणावर हजारो शेतकऱ्यांचा एल्गार!
* ‘तुम्ही पाणी सोडा, अन्यथा आम्ही सोडतो!’ आमदार सिद्धार्थ खरात यांचा प्रशासनाला इशारा; दोन दिवसांत बैठकीचे आश्वासन
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       पेनटाकळी धरणात पाणीसाठा उपलब्ध असतानाही सिंचनासाठी पाणी सोडण्याचा निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला. मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांनी पेनटाकळी धरणावर धडक देत  आंदोलन केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चातून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. ‘तुम्ही पाणी सोडा, अन्यथा आम्ही सोडतो!’ असा स्पष्ट इशारा आमदार खरात यांनी दिल्याने आंदोलनस्थळी वातावरण चांगलेच तापले.
        गेल्या १५ ते २० दिवसांपासून पेनटाकळी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या मुद्द्यावर बैठका, चर्चा आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पिकांना पाण्याची गरज असताना निर्णय घेण्यास विलंब का केला जात आहे, असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांच्या न्याय्य मागणीसाठी शिवसेना मैदानात उतरल्याचे आमदार खरात यांनी सांगितले.

* धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या त्यागाची जाणीव ठेवा!
          पेनटाकळी धरणाच्या उभारणीसाठी याच परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या. अनेकांच्या त्यागातून हे धरण उभे राहिले. असे असताना स्थानिक शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही दुर्दैवी बाब आहे. धरणातून चिखली, बुलढाणा यासह इतर भागांना पाणी दिले जात असेल, तर परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजांचाही प्राधान्याने विचार झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका आमदार सिद्धार्थ खरात यांनी मांडली.

* दोन दिवसांत बैठकीचे आश्वासन          
       पेनटाकळी धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्याचा प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संनियंत्रण समितीकडे असून, या समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे आमदार खरात यांनी स्पष्ट केले. येत्या दोन दिवसांत बैठक घेऊन या प्रश्नावर सकारात्मक निर्णय करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आपणही या बैठकीत सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाणीवाटपाच्या विषयाची संपूर्ण माहिती न घेता केवळ राजकीय विधाने करणे योग्य नाही. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर राजकीय नाट्य न करता प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, असेही खरात यांनी ठणकावून सांगितले.
      या आंदोलनात किशोर गारोळे, आशिष रहाटे, निंबाजी पांडव, अॅड. आकाश घोडे, स्वातीताई नवले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी सिंचन, महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आता दोन दिवसांत होणाऱ्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, पेनटाकळीच्या पाण्याबाबत प्रशासन नेमका काय निर्णय घेते, याची प्रतीक्षा संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांना आहे.