जनहिताच्या प्रश्नांवर निर्णय न झाल्यास राष्ट्रवादीने सत्तेतून बाहेर पडावे! मनोज दांडगेंची ठाम भूमिका* महायुतीतून बाहेर पडून राज्यभर जनआंदोलन उभारण्याची नेतृत्वाकडे मागणी

जनहिताच्या प्रश्नांवर निर्णय न झाल्यास राष्ट्रवादीने सत्तेतून बाहेर पडावे! मनोज दांडगेंची ठाम भूमिका
*  महायुतीतून बाहेर पडून राज्यभर जनआंदोलन उभारण्याची नेतृत्वाकडे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       सरकारने आगामी पंधरा दिवसांत जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा आणि संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक जनआंदोलन उभारावे, अशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा चिखली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज दांडगे यांनी मांडली आहे.
       यासंदर्भात दांडगे यांनी ३ नोव्हेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील, आमदार मनोज कायंदे आणि जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.
        पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावना, सत्तेतील पक्षाच्या भूमिकेबाबतची नाराजी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेच्या प्रलंबित प्रश्नांकडे वरिष्ठ नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दांडगे यांनी या निवेदनातून केला आहे.
        राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना राज्य मंत्रिमंडळात वित्त व नियोजन यांसारखे महत्त्वाचे खाते तसेच निर्णय प्रक्रियेत अपेक्षित अधिकार मिळत नसल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांनी पक्षाची आणि महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारली. अशा नेतृत्वाला सत्तेत सन्मानजनक स्थान आणि योग्य अधिकार मिळणे आवश्यक असल्याचे दांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.
हा विषय केवळ मंत्रिपदापुरता मर्यादित नसून पक्षाचा स्वाभिमान, नेतृत्वाचा सन्मान आणि निष्ठावान कार्यकर्त्यांच्या भावनांशी संबंधित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

* पंधरा दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारा!
          जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून ठोस निर्णय होत नसतील आणि सत्तेत सहभागी असूनही पक्षाला योग्य सन्मान मिळत नसेल, तर सत्तेत राहण्यापेक्षा जनतेच्या बाजूने ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पुढील पंधरा दिवसांत योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा महायुतीतून बाहेर पडून राज्यभर जनआंदोलन उभारण्याचा धाडसी निर्णय घ्यावा, अशी मागणी मनोज दांडगे यांनी केली आहे.