आदिशक्तीचा जागर कार्यक्रमातून बचतीबाबत मार्गदर्शन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हाभरातील धनिक व राजर्षी शाहू मल्टिेस्टेटच्या 100 शाखांवर जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत 16 ऑक्टोबर रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी कार्यक्रम घेण्यात आला. याअंतर्गत महिलांना बचतीचे महत्व व बँकिंग व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा लांजेवार, शाहिना पठाण, राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या स्थानिक संचालक वर्षा पाथरकर, लेखा छाजेड, सुनीता निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना मालतीताई शेळके यांनी उपस्थित महिलांसोबत संवाद साधला. कुटुंबाचे आर्थिक नियोजन आणि आर्थिक सुरक्षितता याबाबत चर्चा करण्यात आली. आपण घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतो. मुलांचे शिक्षण, घर खर्च, शेती, व्यवसाय आणि कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडतो. परंतु एक प्रश्न स्वतःला विचारा की, आपल्या घरावर अचानक आर्थिक संकट आले, तर आपण त्याला सामोरे जाण्यासाठी तयार आहोत का? दुष्काळ, आजारपण, अपघात, उत्पन्न बंद होणे किंवा अचानक मोठा खर्च येणे यांसारख्या परिस्थती कधीही उद्भवू शकतात. म्हणूनच कमी उत्पन्न असले तरी पैशांचे योग्य नियोजन कसे करायचे आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित कसे ठेवायचे. घर चालवताना आपण प्रत्येक रुपयाचा विचार करतो; पण भवष्यातील अडचणींसाठी आपण किती तयारी केली आहे? याबाबत मालतीताई शेळके यांनी मार्गदर्शन केले. आपल्या घरात येणाऱ्या पैशांचे चार भाग करा. यामध्ये घरखर्च, आपत्कालीन निधी, भविष्यासाठी बचत, स्वतःच्या प्रगतीसाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी, व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या आर्थिक स्वावलंबनासाठी काही रक्कम राखून ठेवा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. मंचावर उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
