महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचा ‘प्रोजेक्ट संजीवनी’!* पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची संकल्पना; सात उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती

महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचा ‘प्रोजेक्ट संजीवनी’!
* पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांची संकल्पना; सात उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
        महिला व बालकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, त्यांच्यावरील अत्याचारांना प्रतिबंध घालणे आणि संकटाच्या काळात तातडीने मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या हस्ते बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरात करण्यात आला.
        यावेळी जिल्हाधिकारी प्रविण देवरे, बुलढाणा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, दिशा संस्थेचे संचालक प्रवीण खांडपासळे, डॉ. सतीश जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

* सात उपक्रमांतून महिला व बालकांना सुरक्षा कवच
     ‘प्रोजेक्ट संजीवनी’अंतर्गत जिल्ह्यातील पाचही पोलीस उपविभागांमध्ये सात प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कौटुंबिक कलह, मानसिक तणाव आणि सामाजिक दबावाचा सामना करणाऱ्या महिला व बालकांना समुपदेशन व मानसिक आधार देण्याबरोबरच शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘पोलीस काका’ आणि ‘पोलीस दीदी’ यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.
      बालविवाह रोखण्यासाठी पालक, शिक्षक, ग्रामस्थ आणि समाजातील विविध घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार असून, बालविवाहाची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे.

* दामिनी पथकाची गस्त वाढणार
        महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘दामिनी पथक’ अधिक सक्रिय करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, महिला वसतिगृहे, बाजारपेठा आणि बसस्थानकांच्या परिसरात नियमित गस्त घालून छेडछाड, पाठलाग आणि महिलांना असुरक्षित वाटणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. अशा घटनांमध्ये संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे.

* डायल ११२ बाबत जनजागृती :  हरवलेल्या महिला व बालकांचा शोध
         आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत मिळविण्यासाठी डायल ११२ या सेवेची माहिती महिला व बालकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच हरवलेल्या महिला व मुलांचा शोध घेण्यासाठी आधुनिक तांत्रिक साधने, तपास कौशल्य आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाचा प्रभावी वापर केला जाणार आहे.
जनजागृती, समुपदेशन, प्रभावी पोलीस गस्त, तक्रारींवर तातडीची कायदेशीर कार्यवाही आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या माध्यमांतून महिला व बालकांसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करणे, हे ‘प्रोजेक्ट संजीवनी’चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले, तर अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी आभार मानले. यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवृंद आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा आणि पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.