* जुनी पेन्शन लागू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; शब्दपूर्तीसाठी आम्ही कटिबद्ध : उद्धव ठाकरे यांची शिक्षकांना साद
मुंबई : (एशिया मंच न्यूज)
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. पक्षाचे उमेदवार प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करताना त्यांनी जुनी पेन्शन योजना आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदानाच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
दिलेल्या शब्दाला जागणे हा वंदनीय शिवसेनाप्रमुखांचा संस्कार आहे. मी आणि माझी शिवसेना आजवर त्याच संस्कारानुसार वागत आलो आहोत, असे सांगत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिक्षकांसाठी त्यांनी विशेष पत्र जारी करून प्रा. लहाने यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
* शिक्षक हे समाजाचे शिल्पकार!
शिक्षक हे सुज्ञ आणि सुजाण नागरिक घडविणारे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगती करून थांबू नये, तर ते जबाबदार नागरिक म्हणून घडावेत, अशी अपेक्षा प्रत्येक शिक्षकाची असते. त्यामुळे आदर्श विद्यार्थी घडविणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा प्रतिनिधी विधान परिषदेत असणे आवश्यक आहे, असे ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.
या पार्श्वभूमीवर प्रा. दत्तात्रय लहाने यांच्यासारख्या प्रामाणिक आणि समर्पित उमेदवाराला पक्षाने अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दिल्याचे त्यांनी सांगितले.
* जुनी पेन्शन आणि टप्पा अनुदानासाठी वचनबद्ध
शिक्षकांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे नमूद करत ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचा संदर्भ दिला. आपण मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती. तसेच शिक्षकांच्या जुन्या पेन्शनच्या प्रश्नावर आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू करण्याबाबत लेखी मान्यता दिली होती, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मात्र, पक्षातील काही आमदारांनी साथ सोडल्यामुळे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करता आली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. असे असले तरी शिक्षकांच्या प्रश्नांवर पक्ष स्वस्थ बसणार नाही आणि दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
* प्रा. लहाने यांच्या शपथपत्राची चर्चा :
प्रा. दत्तात्रय लहाने यांनी तहसीलदारांसमक्ष स्वाक्षरी करून लेखी वचन दिल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना आणि नैसर्गिक वाढीनुसार टप्पा अनुदान लागू होईपर्यंत आमदार म्हणून मिळणारे वेतन स्वीकारणार नसल्याचे आश्वासन लहाने यांनी दिल्याचे त्यांनी नमूद केले.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी वैयक्तिक पातळीवर अशी भूमिका घेणाऱ्या उमेदवाराच्या सामाजिक कार्याचाही ठाकरे यांनी गौरव केला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर लढताना समाजातील मूल्ये आणि बांधिलकी जपली गेली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.
* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधान परिषदेत आवाज उठविण्याचे आश्वासन :
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांनी प्रा. दत्तात्रय लहाने यांना पसंती क्रमातील प्रथम क्रमांकाचे मत देऊन विजयी करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधान परिषदेत ठामपणे आवाज उठविण्याची भूमिका लहाने मांडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान आणि शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर या निवडणुकीत चर्चा केंद्रित झाली असून, उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासनांचा आणि प्रा. लहाने यांच्या शपथपत्राचा मुद्दा शिक्षक मतदारसंघाच्या राजकीय चर्चेत महत्त्वाचा ठरत आहे.
