* मेहकरमध्ये कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची घेतली जाणार दखल; मालतीताई शेळके यांची संकल्पना
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
महिलांच्या अंगी असलेले कर्तृत्व, नेतृत्वगुण आणि सामाजिक योगदान समाजासमोर यावे, त्यांच्या कार्याची दखल घेतली जावी आणि त्यांना सन्मानाचा विचारमंच मिळावा, या उद्देशाने राजर्षी शाहू मल्टीस्टेट मेहकर शाखेच्या वतीने ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता मेहकर येथील डोणगाव रोडवर, एचडीएफसी बँकेसमोर असलेल्या राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या कार्यालयासमोर हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
आजरोजी महिला शिक्षण, व्यवसाय, सामाजिक कार्य, उद्योग, सहकार आणि विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. मात्र, अनेक महिलांचे कार्य त्यांच्या परिसरापुरतेच मर्यादित राहते. अशा महिलांना हक्काचा विचारमंच मिळावा, त्यांच्या कार्याची समाजाला ओळख व्हावी आणि त्यांच्या यशातून इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी, या सकारात्मक भावनेतून ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांनी केवळ स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापुरते मर्यादित न राहता आत्मविश्वासाने पुढे यावे, स्वतःमधील क्षमता ओळखावी आणि आपल्या कर्तृत्वातून समाजात वेगळी ओळख निर्माण करावी, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा विचार आहे. महिलांच्या कार्याचा गौरव केल्याने त्यांना नवी ऊर्जा मिळते, तसेच इतर महिलांनाही पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.
महिलांच्या कर्तृत्वाला सन्मान, त्यांच्या कार्याला ओळख आणि त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राजर्षी शाहू मल्टीस्टेट मेहकर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
