चिखली : (एशिया मंच न्यूज )
पत्रकारितेबरोबरच कलाक्षेत्रातही प्रबोधनात्मक व संगीतमय गीत गायनाच्या माध्यमातून ठसा उमटवणारे कवी,गायक संजय कलाईनाथा निकाळजे यांना लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेद्वारे देण्यात येणारा राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही "कलाभूषण पुरस्कार २०२७" जाहीर झाला आहे.असे त्यांना सोमवार १२ ऑक्टोबर रोजी पुरस्कार निवड समितीच्या वतीने एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असलेल्या कोलारा ह्या छोट्याशा खेडेगावात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार तथा कवी, गायक संजय कलाईनाथा निकाळजे हे विद्यार्थी जीवनापासूनच विविध विषयावर कविता रचना करत असतात. अनेक वृत्तपत्रातून त्यांच्या कविता सदोदित प्रकाशित होत असतात. गेल्या काही वर्षापासून बुद्ध- शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांच्या जीवन चरित्रावरील कविता तसेच गीतांची रचना करून त्याचे संगीतमय व प्रबोधनात्मक सादरीकरण तसेच हर्षसंगम कराओके म्युझिकल सॉंगच्या माध्यमातून गीत गायनाच्या रूपाने महापुरुषांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचे काम ते तालुका किंवा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर करीत असतात. सध्या त्यांचे "संविधान लिहून ठेवलं बाबा भिमान" हे स्वरचित गीत प्रचंड गाजत असून त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. पत्रकारितेबरोबरच अल्पावधीतच कलाक्षेत्रात देखील त्यांचे योगदान व कार्य पाहता त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन लोकसेवा शिक्षण व क्रीडा बहुउद्देशीय संस्था मारुती पेठ ता. मेहकर जि.बुलढाणाच्या (नोंदणी क्रमांक १०७/२६) वतीने त्यांना राज्यस्तरीय न्यायहक्क समताशाही कलाभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार जानेवारी २०२७ मध्ये दै.न्यायहक्क समताशाही व साप्ताहिक जानेफळ एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य दिव्य सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार असून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे .असे त्यांना जा.क्र.६ सोमवार १२ ऑक्टोबर २०२६ रोजी निवड पत्राद्वारे पुरस्कार निवड समितीचे संपादक अशोकभाऊ शेजुळ तसेच साहित्यिक, कवी, लेखक अनिल भगवान चव्हाण यांनी कळविले आहे.
