सुरेश देवकरांच्या नेतृत्वाने अमरावती विभागात इतिहास घडणार!
* ‘ देवकर महापुरुषांचे वैचारिक वारसदार - कपिल पाटील यांचे प्रतिपादन
* बुलढाण्यातील अतिविराट सभेत परिवर्तनाचा हुंकार!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
"अमरावती शिक्षक मतदार संघ सुरुवातीपासूनच परिवर्तनाचे केंद्र राहिले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख आणि शिक्षणतज्ञ, शिक्षक नेते बी.टी. देशमुख यांनी अमरावती विभागात विकासाचा अनुशेष भरून काढला. महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी दिशा दाखविली. अशा थोर समाज सुधारकांच्या विचारांचे प्रवाहक असलेल्या सुरेश देवकर यांच्या नेतृत्वाने शिक्षक मतदार संघाची अस्मिता जागृत ठेवली आहे. त्यामुळे देवकर यांच्या रूपाने अमरावती विभागात इतिहास घडणार, असा विश्वास शिक्षक भारतीचे कपिल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांच्या प्रचारार्थ रविवार १८ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिर सभागृहात सांगता सभा पार पडली. यावेळी, मुख्य मार्गदर्शक कपिल पाटील बोलत होते. याप्रसंगी विचारपीठावर अमरावती विभागीय अध्यक्ष तथा उमेदवार सुरेश देवकर, प्रमुख अतिथी म्हणून संभाजी बिग्रेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आणि स्त्री शिक्षणाचे प्रतीक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्ञानज्योती फातिमा शेख, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुभाष मोरे आणि सौरभ खेडेकर यांच्या भाषणांनी सभागृहात उत्साह भरला. पुढे बोलताना, कपिल पाटील म्हणाले की, सुरेश देवकर यांच्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यांच्याकडे वैज्ञानिक दृष्टी आहे, थोर समाज सुधारकांच्या विचारांचे वारसदार म्हणून देवकर सरांकडे बघितले जाते. ज्या संस्थेत शिक्षण घेतले, त्या संस्थेसाठी वस्तीगृह बांधणे, छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी लाखो रूपयांची मदत करणे, अशी मोठी कामे देवकर यांनी केली आहे. आमदार बनल्यानंतर शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी अभिप्रेत असणारे निर्णय देवकर यांच्या पुढाकारातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र असल्याने देवकर स्त्री - पुरुष तुलना ग्रंथ लिहिणाऱ्या आणि समतेचा विचार देणाऱ्या ताराबाई शिंदे यांचे स्मारक ते बांधणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल रिंढे यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष अशोक खोरखेडे यांनी मानले.
* विजयाची किल्ली बुलढाणा जिल्ह्याकडे!
शिक्षक भारतीने बुलढाणा जिल्ह्यात ९ हजार ८१० शिक्षक मतदारांची नोंदणी करून विक्रम केला आहे. या आकड्यामुळे अमरावती शिक्षक मतदार संघाचा आमदार बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षक ठरवणार, असे स्पष्ट झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षकांची मते जाणून घेतल्यानंतर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत शिक्षकांची ३६ वर्षाची इच्छा पूर्ण होणार आहे, असे संकेत मिळत असून, ही निवडणूक शिक्षकांनी हाती घेतली आहे, यामुळे विजयाची किल्ली बुलढाणा जिल्ह्याकडे आहे, असे देवकर यांनी सांगितले.
* ‘प्रचारसभा नव्हे वैचारिक सभा’
सुरेश देवकर यांच्या प्रचारार्थ अमरावती विभागातील सांगता सभा म्हणून झालेली बुलढाणा येथील सभा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक ठरली. सभागृहाबाहेर लावण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनीमुळे सुरेश देवकरांच्या व्यापक विचारांची प्रचीती मिळाली. त्यामुळे, ही प्रचारसभा नसून वैचारिक सभा झाली, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
