* जिल्हा परिषद शिक्षकाच्या कारची दुभाजकातील पथदिव्याच्या खांबाला धडक; कुटुंबातील अन्य सदस्य जखमी
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
देऊळगाव राजा येथे चिखली मार्गावरील पद्मबुद्धी पेट्रोलियमसमोर झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय उच्चशिक्षित वैष्णवी घुगे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी हा अपघात घडला. या दुर्घटनेत वाहनातील अन्य प्रवासी जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जालना येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
* नेमकी घटना काय?
प्राप्त माहितीनुसार, मेंडगाव येथील मूळ रहिवासी बद्रीनाथ गणपत घुगे (वय ५५) हे डोईफोडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब भगवान बाबा नगर येथे वास्तव्यास आहे. त्यांचे सहकारी शिक्षक रवी रघुनाथ मिसाळ हेदेखील याच शाळेत कार्यरत आहेत.
रविवारी सकाळी बद्रीनाथ घुगे आणि रवी मिसाळ हे आपल्या कुटुंबीयांसह मेंडगाव येथून स्विफ्ट डिझायर (एमएच २८ बीके ८७१८) या खासगी वाहनाने देऊळगाव राजाकडे येत होते. वाहनात बद्रीनाथ घुगे, रंजना घुगे, वैष्णवी घुगे, रवी रघुनाथ मिसाळ आणि अश्विनी मिसाळ हे प्रवास करीत होते.
देऊळगाव राजा शहरातील चिखली मार्गावर पद्मबुद्धी पेट्रोलियमसमोर आल्यानंतर वाहनाची रस्त्याच्या दुभाजकात असलेल्या पथदिव्याच्या खांबाला जोरदार धडक बसली. या अपघातात वैष्णवी घुगे हिचा मृत्यू झाला, तर वाहनातील अन्य प्रवासी जखमी झाले.
* अपघाताच्या वृत्ताने परिसरात शोककळा
जखमींना देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
घरापासून अवघ्या काही अंतरावर पोहोचण्याच्या मार्गावर काळाने घाला घातल्याने वैष्णवीच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेमुळे घुगे आणि मिसाळ कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
