बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मानस फाउंडेशनच्या विधवा परिषदेसाठी पाहुणे म्हणून हरीश इथापे आले होते. हरीश इथापे नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनचे फाऊंडर सदस्य....नानाचे जवळचे मित्र व सहकारी. संध्याकाळी हॉटेल निवांत वर पारिवारिक जेवण होते. गप्पांच्या ओघात पुढच्या विधवा परिषदेसाठी नानाला बुलढाण्यात घेऊन येतो असे हरीशभाई म्हणाले. आज सकाळी नानाच्या निधनाची बातमी कळली आणि हे सर्व आठवले.नानाची बुलढाण्याची भेट आता कायमची टळली आहे.
सकाळी पेपर स्टॉलवर गेलो तेव्हा टीकार साहेबांनी प्रथम ही बातमी सांगितली. मन सुन्न झाले. जवळचा व्यक्ती जावे अशा पद्धतीने.
नाना पाटेकर या व्यक्तीशी राज्यातीलच नव्हे तर देशातील प्रत्येक माणसाचे भावनिक नाते जोडल्या गेले होते हे आज जाणवले. नाना गेले आणि देशातील प्रत्येक माणूस हळहळला.पडद्यावर आक्रमक नायक,हिंस्र माणूस,कुणालाही खिसगणतीत घेणारा हिरो.पण दुसरीकडे नाम च्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी आधारवड...एकीकडे पडद्यावर 10-10 ला भारी पडणारा नाना कारगिल वेळी हातात बंदूक घेऊन चक्क कारगिल खोऱ्यात उतरतो.....(आपले हिरो असे असतात का?) अभिनयाच्या अफाट कर्तृत्वाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर हे केवळ पडद्यावरच नाही, तर प्रत्यक्ष आयुष्यातही देशासाठी समर्पित 'रिअल हिरो' आहेत.
१९९९ मधील भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कारगिल युद्धाच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेल्या अचाट देशभक्तीमुळे त्यांची ही ओळख देशवासियांच्या मनात कायमची कोरली गेली आहे.तेव्हा वाजपेयी सरकार होते.
१९९९ मध्ये जेव्हा कारगिल युद्ध सुरू झाले, तेव्हा संपूर्ण देश चिंतेत आणि आक्रोशात होता. अशा अत्यंत कठीण आणि थरारक परिस्थितीत नाना शांत बसू शकले नाही. त्यांनी तातडीने तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांची भेट घेतली आणि कारगिलच्या रणधुमाळीत थेट युद्धभूमीवर जवानांसोबत जाण्याची परवानगी मागितली. सीमेवरील परिस्थिती ही अत्यंत धोक्याची असतानाही, प्राणाची पर्वा न करता सीमेवर जाण्याचा त्यांचा निर्धार पक्का राहिला.
परवानगी मिळताच नाना कोणत्याही सुरक्षेची किंवा प्रसिद्धीची तमा न बाळगता थेट कारगिल खोऱ्यातील अत्यंत खडतर आणि धोकादायक भागात जिथे गोळीबार सुरू होता तिथे उतरले. (रियल हिरो असा असतो...)
ही औपचारिक भेट नव्हती. त्यांच्या उपस्थितीने उणे तापमानात आणि शत्रूच्या गोळीबारात प्रत्यक्ष लढणाऱ्या भारतीय जवानांचे मनोबल प्रचंड वाढले.देशातील एका प्रसिद्ध अभिनेत्याला आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे पाहून सैनिकांमध्य ऊर्जा आणि जोश संचारला.
नाना पाटेकर यांचा भारतीय सैन्याशी असलेला संबंध केवळ कारगिल युद्धापुरता मर्यादित नव्हता. 'प्रहार' चित्रपटाच्या वेळी त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रीतसर सैन्य प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे सैन्याची शिस्त, त्यांचे कष्ट आणि सीमेवरील कठीण आयुष्य यांची त्यांना पूर्ण जाणीव त्यांना होती. कारगिल युद्धादरम्यान त्यांनी दाखवलेले धैर्य हेच सिद्ध करते की, ते देशासाठी कोणत्याही थराला जाण्यास नाना तयार होते.
युद्धाच्या काळात जवानांना धीर देणे असो किंवा युद्धांतर 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे असो, नाना पाटेकर यांनी वेळोवेळी आपली सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकी सिद्ध केली. "देशासाठी जगायचे आणि गरज पडल्यास देशासाठी प्राणही द्यायचे" ही भावना त्यांनी केवळ शब्दांत नाही, तर आपल्या कृतीतून दाखवून दिली.कारगिल युद्धातील त्यांची ही भूमिका प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत प्रेरणादायी असून, देशभक्तीचे खरे अर्थ काय असतात, याचे ते एक मूर्तिमंत उदाहरण आहे.
वयाच्या ७५ व्या वर्षी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीसह समाजकारणातील एक संघर्षशील आणि बाणेदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, देश व समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनय आणि संवादफेकीच्या जोरावर एक वेगळे स्थान निर्माण केले होते. 'तिरंगा ' चित्रपटातील शिवाजीराव वागळे ही भूमिका आणि त्यांचा रोखठोक अंदाज प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहीला. 'तिरंगा' चित्रपटात त्यांनी दाखवलेला जोश, देशप्रेम आणि संवादफेक आजही अंगावर काटा आणते. 'क्रांतिवीर', 'अग्निसाक्षी', 'परिंदा' यांसारख्या अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अत्यंत साधे राहणीमान आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख होती.
सह्याद्रीच्या मातीतील या महान कलाकाराला आणि तितक्याच संवेदनशील माणसाला दुःखद भावपूर्ण निरोप!
*✍️Ganesh nikam kelwadkar
