दुष्काळप्रश्नी तुपकर आक्रमक ; आठवडाभरात निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
* विभागीय आयुक्तांची भेट; हेक्टरी १ लाख मदत, सरसकट कर्जमाफी, पीकविमा व नियमित कर्जदारांना २ लाख अनुदानाची मागणी
छत्रपती संभाजीनगर : (एशिया मंच न्यूज )
मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांना १३ मागण्यांचे निवेदन सादर केले.
तुपकरांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या :
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी,
२०२४ व २०२५ चा प्रलंबित पीकविमा १०० टक्के अदा करावा, २०२६ चा पीकविमा तातडीने मंजूर करून वितरित करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट व विनाअट कर्जमाफी करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होऊ नये, यासाठी बँकांना आदेश द्यावेत, २०१९ पूर्वीचे, पुनर्गठित व रूपांतरित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा, मायक्रोफायनान्स कंपन्या, पतसंस्था व खासगी सावकारांच्या कर्जवसुलीच्या दंडेलशाहीला आळा घालावा, वसुलीच्या नावाखाली धमकी अथवा मानसिक त्रास देणाऱ्यांवर कारवाई करावी, पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करावी.
दुष्काळग्रस्त जनावरांसाठी चारा थेट शेतकऱ्यांच्या दावणीला उपलब्ध करून द्यावा, जळालेले व नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलून वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांसाठी स्वतंत्र आर्थिक मदत व विशेष पॅकेज द्यावे.
“शेतकऱ्याने उत्पादनासाठी लाखो रुपये खर्च केले; मात्र हातात काहीच उरले नाही. सरकारने किमान उत्पादन खर्चाची तरी भरपाई करावी,” अशी मागणी तुपकरांनी केली.
दरम्यान, आठवडाभरात मागण्यांवर ठोस निर्णय घ्या, अन्यथा मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीवजी कसबे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चैत्रालीताई शेलार, मराठवाडा अध्यक्ष गजाननजी कावरखे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
