* शिक्षकांचा सन्मान, शिक्षकांचा अभिमान या भूमिकेत काम करणार : प्रा.लहाने
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रा. दत्तात्रय लहाने यांनी आज अमरावती येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, शिक्षक प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षकांचा सन्मान, शिक्षकांचा अभिमान” या भूमिकेत काम करणार असल्याचे प्रा.दत्तात्रय लहाने यांनी म्हटले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार ज. मो. अभ्यंकर, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, नरेंद्र खेडेकर यांच्यासह अमरावती विभागातील विविध जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रा. दत्तात्रय लहाने यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनात्मक पातळीवर काम केले असून आंदोलने, निवेदने आणि शासन स्तरावरील पाठपुराव्याच्या माध्यमातून शिक्षकांच्या मागण्या मांडल्या आहेत.
शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि शिक्षकांचा आवाज सभागृहापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका प्रा. लहाने यांनी यावेळी व्यक्त केली.
जुनी पेन्शन योजना, समान काम-समान वेतन, शिक्षकांची सेवा सुरक्षा, शिक्षण सेवकांचे प्रश्न, अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांशी संबंधित प्रश्न तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा पाठपुरावा करण्यावर आपला भर राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रा. दत्तात्रय लहाने यांना अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रा. लहाने यांनी विभागातील विविध भागांत शिक्षकांशी संवाद आणि भेटीगाठींवर भर दिला आहे.
आज 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करताना अमरावती विभागातील विविध भागांतून आलेल्या पदाधिकारी, शिक्षक आणि समर्थकांची उपस्थिती पाहायला मिळाली. अर्ज दाखल झाल्यानंतर आता प्रा. दत्तात्रय लहाने यांच्या प्रचाराला अधिकृतपणे वेग येणार असून पाचही जिल्ह्यांतील शिक्षकांशी थेट संवादावर भर दिला जाणार आहे.
