शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड!* सुप्रिया शिंदे व सृष्टी डोईफोडे यांची सुवर्णपदकांसह दुहेरी कामगिरी; माधुरी गाडेकर हिला कांस्यपदक!

शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलच्या दोन खेळाडूंची राज्यस्तरावर निवड!
* सुप्रिया शिंदे व सृष्टी डोईफोडे यांची सुवर्णपदकांसह दुहेरी कामगिरी; माधुरी गाडेकर हिला कांस्यपदक!
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
       येथील देऊळगाव राजा हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विभागस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर घातली आहे. १४ ते १६ ऑक्टोबर २०२६ दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल यवतमाळ येथे झालेल्या स्पर्धेत सुप्रिया शिंदे व सृष्टी डोईफोडे यांनी प्रत्येकी दोन सुवर्ण पदके पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली, तर माधुरी गाडेकर हिने कांस्यपदक मिळविले.

       १७ वर्षे वयोगटात कु. सुप्रिया विकास शिंदे हिने गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून दोन सुवर्णपदके पटकावली. १९ वर्षे वयोगटात कु. सृष्टी प्रभाकर डोईफोडे हिनेही गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदकांची दुहेरी कमाई केली. तसेच १७ वर्षे वयोगटात कु. माधुरी दत्तात्रय गाडेकर हिने तिहेरी उडीत तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक प्राप्त केले.

        या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आर. बी. कोल्हे, उपमुख्याध्यापक डी. व्ही. जाधव व पर्यवेक्षक पी. के. राठोड यांच्या हस्ते सर्व गुणवंत खेळाडूंचा त्यांच्या पालकांसह पुष्पगुच्छ, पुष्पहार व मेडल देऊन उचित सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा मार्गदर्शक एस. व्ही. मुळे यांचेही अभिनंदन करण्यात आले. आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

        विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील प्रगती अधोरेखित झाली असून, त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि योग्य क्रीडा मार्गदर्शनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.