मिशन पँथर 1970’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक मोशन पोस्टरचे सुनील शेळके यांच्याहस्ते होणार उद्घाटन

‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाच्या फर्स्ट लूक मोशन पोस्टरचे 
सुनील शेळके यांच्याहस्ते होणार उद्घाटन

नागपूर : (एशिया मंच न्यूज )
       दलित पँथर चळवळीचा ऐतिहासिक संघर्ष, स्वाभिमान, विद्रोह आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी सज्ज होत असलेल्या आगामी ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाच्या अधिकृत वेबपेज आणि फर्स्ट लूक मोशन पोस्टरचे उद्घाटन मंगळवार २० ऑक्टोबर २०२६ रोजी ऐतिहासिक दीक्षाभूमी येथील आतील ग्राउंड, स्टॉल क्रमांक ५०, नागपूर येथे करण्यात आले आहे.

      धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांतून प्रेरणा घेणाऱ्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा इतिहास, दलित पँथरचा लढाऊ वारसा आणि स्वाभिमानाची भूमिका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत आहे.
        या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिता फिल्म प्रोडक्शनचे निर्माते सुनील शेळके यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक  शैलेंद्र कृष्णा बागडे, चित्रपटातील प्रमुख कलाकार तसेच संपूर्ण निर्मिती टीम उपस्थित राहणार आहे.
चित्रपटाच्या अधिकृत वेबपेजचे लोकार्पण आणि फर्स्ट लूक मोशन पोस्टरचे अनावरण हा या सोहळ्याचा मुख्य आकर्षणाचा भाग असेल. या माध्यमातून चित्रपटाच्या संकल्पने विषयी, त्याच्या निर्मितीविषयी आणि कलाकारांच्या भूमिकांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. तसेच उपस्थितांना कलाकार आणि निर्मिती टीमशी थेट संवाद साधता येणार आहे.
दलित पँथर चळवळीचा इतिहास हा केवळ संघर्षाचा इतिहास नसून अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची, सामाजिक समतेसाठी लढण्याची आणि मानवी प्रतिष्ठेचा आग्रह धरण्याची प्रेरणाही आहे. या ऐतिहासिक चळवळीचा विचार चित्रपटाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने ‘मिशन पँथर 1970’ या चित्रपटाकडे लक्ष लागले आहे.

       या उद्घाटन सोहळ्याला सर्व चित्रपटप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी विचारांचे अनुयायी आणि नागरिकांनी उपस्थित राहून ‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.