बुलढाण्यात कोजागिरीच्या पूर्वसंध्येला ‘चांदण्यातली गझल’
*मित्रांगण परिवारातर्फे एडेड हायस्कूलच्या प्रांगणात सुरेल गझल मैफल
* डॉ. राजेश उमाळे यांच्या स्वरांनी रंगणार चांदणी रात्र
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शरद ऋतूतील चांदण्यांची मोहक बरसात, मराठी गझलांचे भावस्पर्शी सूर आणि संगीताची अविस्मरणीय मैफल अनुभवण्याची संधी बुलढाणेकरांना मिळणार आहे. मित्रांगण परिवार, बुलढाणा यांच्या वतीने शनिवार २४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘मराठी गझलांची कोजागिरी अर्थात चांदण्यातली गझल’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता एडेड हायस्कूल, बुलढाणा येथील आतील प्रांगणात ही मैफल रंगणार आहे.
गझल हा केवळ काव्य आणि संगीताचा प्रकार नसून मानवी भावभावनांना स्वर देणारी एक कलात्मक अनुभूती आहे. प्रेम, विरह, संवेदना आणि जीवनातील विविध भावछटांनी नटलेली मराठी गझल समृद्ध आणि व्यापक व्हावी, या हेतूने मागील दहा वर्षांपासून मित्रांगण परिवाराकडून दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला 'मराठी गझलांची कोजागिरी' मैफिल आयोजित केली जाते. प्रसिद्ध गझलकार तसेच लोकप्रिय गझलगायकांची मित्रांगण परिवाराने बुलढाणेकरांसोबत भेट घडविली आहे.
यावर्षी मित्रांगणच्या अंगणी 'चांदण्यातील गझल...' उजळणार आहे. या कार्यक्रमात स्वररत्न डॉ. राजेश उमाळे आपल्या सुरेल गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना तबल्यावर शितल मांडवगडे, व्हायोलिनवर हरीश लांडगे आणि ऑर्गनवर सागर काळे यांची संगीतसाथ लाभणार आहे. या अनुभवी कलाकारांच्या सुरेल साथीने मराठी गझलांची ही मैफल अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे निवेदन नितीन भट करणार आहेत.
चांदण्यांची रात्र, मराठी गझलांचे सूर आणि संगीताची अवीट गोडी असा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी ‘चांदण्यातली गझल’ या मैफलीला शहरातील गझलप्रेमी, साहित्यरसिक आणि संगीतप्रेमींनी तसेच बुलढाणेकरांनी आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन मित्रांगण परिवाराच्या वतीने चंद्रशेखर जोशी, आनंद संचेती, डॉ. राजेंद्र उबरहंडे, डॉ. आशिष खासबागे, कमलेश कोठारी, मनोज बुरुड, रणजीतसिंग राजपूत, विक्की चव्हाण, रितेश खडके (जैन), अभिजीत निंबाळकर आणि सुनीता प्रकाश जोशी यांनी केले आहे.
