* चाकोरीबाहेरील मैत्रिणीच्या कर्तृत्वाला, संघर्षाला सलाम
* ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पुस्तक आणि ‘लेट्स इव्हॉल्व्ह’ मासिकाचा ही शुभारंभ
पुणे : (एशिया मंच न्यूज )
घर, कुटुंब, नाती आणि सामाजिक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळतानाच स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांच्या कार्याला सलाम आणि त्यांच्या संघर्षाला कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी मनमुक्त फाउंडेशनच्या वतीने ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पाषाण, पुणे येथील सी.पी.आर. सभागृहात झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दहा कर्तृत्ववान महिलांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला.
“वेदनेला हरवलेस तू, संवेदनेला जागवलेस तू, नियतीलाही नमवलेस तू, यशास कमवलेस तू… शाब्बास! भेदलीस चाकोरी ‘तू’!” या भावनेला केंद्रस्थानी ठेवून झालेल्या या सोहळ्याला सन्मानापेक्षा कृतज्ञतेचा आणि पुरस्कारापेक्षा संघर्षाला सलाम करण्याचा वेगळा अर्थ लाभला. दीपाली बांद्रे, दीपाक्षी शिंगारे, मनीषा गंपले, प्रियंका भिडे, प्रतिभा गुरव, प्रणोती शितोळे, राजश्री चिंतामणी, रेणुका कड, सायली चौगुले आणि विद्या काटकर या दहा महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रत्येक सन्मानार्थीचा जीवनप्रवास वेगळा असला तरी स्वतःच्या चौकटीपलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या कार्यातील समान धागा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मनमुक्त फाउंडेशनच्या संचालिका अस्मिता काळे यांनी केली. सूत्रसंचालन डॉ. पराग कलण, दिव्या भोसले आणि प्रथमेश भोसले यांनी केले, तर मनमुक्त फाउंडेशनच्या संचालिका मनीषा कुऱ्हाडे यांनी आभार मानले. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संपादक गीताली वी. मं., पोलीस उपायुक्त नम्रता पाटील आणि डॉ. वर्षा कुऱ्हाडे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
या सोहळ्याला दोन महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या शुभारंभाचीही जोड मिळाली. दिव्या भोसले लिखित ‘ये हृदयीचे ते हृदयी’ या मनमुक्त फाउंडेशनशी संबंधित पुस्तकाच्या पोस्टरचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच २ ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मनमुक्त फाउंडेशनच्या विचारविश्वाला व्यापक व्यासपीठ देणाऱ्या ‘लेट्स इव्हॉल्व्ह’ या नव्या मासिकाचा शुभारंभ करण्यात आला. ‘समजून घ्या. चिंतन करा. घडत चला.’ या विचारातून व्यक्तीने स्वतःला समजून घ्यावे, अंतर्मनाचे चिंतन करावे आणि अधिक सजग, संवेदनशील व अर्थपूर्ण जीवनाकडे वाटचाल करावी, हा या मासिका मागील मुख्य विचार असून ते दर महिन्याला प्रकाशित करण्यात येणार आहे.
आजच्या काळात यशाची व्याख्या अनेकदा पद, पैसा आणि प्रतिष्ठेपुरती मर्यादित केली जाते. मात्र, एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे, अन्यायाविरुद्ध उभे राहणे, ज्ञानाची ज्योत तेवत ठेवणे, निराधारांना आधार देणे किंवा समाजपरिवर्तनासाठी सातत्याने कार्यरत राहणे, हेही तितकेच मोठे कर्तृत्व आहे. याच जाणिवेतून ‘चाकोरीबाहेरील मैत्रिणी’ हा उपक्रम उभा राहिला आहे. हा केवळ सन्मान नसून समाजासाठी काम करणाऱ्या स्त्रियांच्या योगदानाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे.
मनमुक्त फाउंडेशनच्या ‘व्यक्त व्हा • रिक्त व्हा • मुक्त व्हा’ या विचारधारेतून आयोजित करण्यात आलेला हा सोहळा स्त्रीच्या कर्तृत्वाला नवी ओळख देतानाच तिच्या संघर्षाकडे, संवेदनशीलतेकडे आणि सामाजिक योगदानाकडे अधिक सजगतेने पाहण्याचा संदेश देणारा ठरला. कर्तृत्वाच्या पलीकडे जाऊन संघर्षाला सलाम करणारा आणि नव्या विचारांना व्यासपीठ देणारा हा सोहळा मनमुक्त फाउंडेशनच्या सामाजिक वाटचालीतील अर्थपूर्ण टप्पा ठरला.
