समाज जागृत ठेवण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची - डॉ. शशिकांत पाटील* श्री व्यंकटेश महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कवी संमेलन

समाज जागृत ठेवण्यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची - डॉ. शशिकांत पाटील
* श्री व्यंकटेश महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त कवी संमेलन
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
         समाज जागृत ठेवण्यासाठी साहित्यिकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांनी सातत्याने समाजाला उद्बोधक ठरणारे लेखन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. शशिकांत पाटील यांनी केले. 
       स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त आयोजित कवी संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन प्रतिनिधी सौ. छायाराजे विजयसिंह जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. 

        अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अभिजात मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी साहित्यिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. डॉ. शशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कवी संमेलनात डॉ. प्रभाकर शेळके, नजीम खान, एजाज खान, प्रा. प्रशांतकुमार डोंगरदिवे, रामदास कोरडे यांनी विविध विषयावर कविता सादर करून संमेलन बहारदार केले. याप्रसंगी मराठी विभागाच्या वतीने आयोजित चारोळी लेखन स्पर्धेतील विजेत्या कु. गायत्री राऊत आणि कु. भक्ती लटके यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या विद्यार्थिनींनी देखील चारोळ्या सादर केल्या. 

         श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त व महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी संमेलन संयोजक व मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रदीप राठोड यांनी केले व आभार डॉ. ज्योती ढोकले यांनी मानले.
कवी संमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.