विद्येच्या माहेरघरात ‘सत्यशोधक कॉन्क्लेव्ह’चा दणदणीत जागर; बाजारीकरणाच्या विळख्यातील शिक्षणावर सडेतोड मंथन!सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्याहस्ते उद्घाटन

विद्येच्या माहेरघरात ‘सत्यशोधक कॉन्क्लेव्ह’चा दणदणीत जागर; 
 बाजारीकरणाच्या विळख्यातील शिक्षणावर सडेतोड मंथन!
* डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात रंगले बौद्धिक मंथन; ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते तथा निवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्याहस्ते उद्घाटन
पुणे : (एशिया मंच न्यूज)
        महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेसमोरील वाढती आव्हाने आणि शिक्षणाच्या बाजारीकरणावर चर्चा करण्यासाठी पुण्यात  ‘सत्यशोधक कॉन्क्लेव्ह २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात रविवारी २७ सप्टेंबर झालेल्या या परिषदेला शिक्षणप्रेमी, विचारवंत आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       ‘महात्मा फुले यांच्या शैक्षणिक मुक्तीचा विचार आणि आजच्या संकटातील अंधकारमय सार्वजनिक शिक्षण : एक पुनरावलोकन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर परिषदेत सविस्तर विचारमंथन करण्यात आले. ‘सत्यशोधक’ चित्रपटाचे निर्माते तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांच्या हस्ते कॉन्क्लेव्हचे उद्घाटन झाले.
        यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे महानगरपालिकेच्या मुख्य विधी अधिकारी अॅड. निशा दाभाडे-चव्हाण उपस्थित होत्या. त्यांनी ऐतिहासिक भिडे वाड्याच्या कायदेशीर लढ्याची माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे यांनी शिक्षणाच्या वाढत्या बाजारीकरणावर भाष्य केले. शिक्षण हे ज्ञानप्राप्तीचे माध्यम राहण्याऐवजी नफ्याचे क्षेत्र बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. खासगी व आंतरराष्ट्रीय शाळांची वाढ होत असताना सरकारी शाळांसमोरील आव्हाने वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. या परिस्थितीचा सर्वसामान्य आणि बहुजन घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी मांडला.
     ‘द सत्यशोधक’चे संपादक व पीएचडी संशोधक तेजस हरड यांनीही सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेवरील संकटाकडे लक्ष वेधले. महात्मा फुले यांनी शिक्षणाची मक्तेदारी मोडून सर्वांसाठी ज्ञानाची दारे खुली करण्याचे काम केले; मात्र आजच्या परिस्थितीत ही दारे पुन्हा संकुचित होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक शिक्षणव्यवस्था सक्षम करण्यासाठी समाजाने सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
    या वैचारिक उपक्रमाच्या आयोजनासाठी  ‘सत्यशोधक कॉन्क्लेव्ह समिती, २०२६’ च्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“महात्मा फुले यांनी रोपट्यारूपात लावलेला शिक्षणाचा ज्ञानवृक्ष आज संकटात सापडला आहे. सामान्य जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे नवे षड्यंत्र रचले जात असून, याविरुद्ध पुन्हा एकदा सत्यशोधक विचारांची चळवळ उभी करण्याची वेळ आली आहे.”
— सुनील शेळके, उद्घाटक तथा निर्माते, ‘सत्यशोधक’