* कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची मागणी; पीक विमा तातडीने देण्याची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज)
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, पीक विम्याची रक्कम तातडीने अदा करावी, तसेच स्मार्ट मीटरची सक्ती व आर्थिक भार थांबवावा, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज, २९ सप्टेंबर रोजी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता जिजामाता प्रेक्षागार मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे धडकणार आहे.
पावसाचा दीर्घ खंड पडल्याने खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. त्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करून कागदपत्रांच्या जाचक अटी न लावता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय पीक विम्याचा मोबदला तातडीने अदा करावा, शेतीसाठी पूर्ण क्षमतेने व सुरळीत वीजपुरवठा करावा, विद्यार्थ्यांची फी माफ करावी, कर्जमाफीच्या उर्वरित याद्या तातडीने जाहीर कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट मीटरची सक्ती थांबवून वीज बिलांचा आर्थिक भार कमी करावा, वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी धोरणे राबवावीत, तसेच पशुधनासाठी निर्माण होणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेऊन चारा छावण्या सुरू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारा सन्मान निधी वाढविण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणीही मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने शेतकरी आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
