* कुठूनही घुसा,पण मुंबईच्या आझाद मैदानावर दिसा ! - भाई छोटू कांबळे
* बुलढाणा जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने समाजबांधव होणार सहभागी
चिखली : (एशिया मंच न्यूज )
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अथवा लाभधारक व लाभवंचित अशा पद्धतीने उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने l २९ सप्टेंबर रोजी मुंबईत निर्धार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग असून, राज्यभरातून लाखो समाज बांधव सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातून हजारो समाजबांधव मुंबईत दाखल होणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या निर्णयानुसार राज्य सरकारने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मातंग समाजाच्या विविध प्रश्नांसाठी राज्यभरात आतापर्यंत ७७ मोर्चे काढण्यात आले आहेत. आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची आणि न्याय हक्काची आहे. आता नाही तर कधीच नाही ! त्यामुळे समाजबांधवांनी हा लढा मोठ्या ताकदीने द्यायचा आहे. घरची भाकर-ठेचा बांधून मुंबई गाठा ;
कुठूनही घुसा, पण निर्धार महामोर्च्यात मुंबईच्या आझाद मैदानावर दिसा! असे आक्रमक आवाहन मातंग सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा युवा नेते भाई छोटू कांबळे यांनी केले आहे.
आरक्षणाच्या न्याय्य हक्कासाठी समाजबांधवांनी एकजुटीने मोठ्या संख्येने मुंबईतील निर्धार महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मातंग समाज यांनी केले आहे.
