बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा; हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी* कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

बुलढाण्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ; हेक्टरी एक लाख रुपये मदतीची मागणी
* कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        राज्यभरातील दुष्काळी परिस्थिती पाहता राज्य सरकारने कोरड्या दुष्काळाबाबत काढलेला शासन निर्णय (जीआर) हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये रोख मदत द्यावी, कर्जाचे पुनर्गठन करण्याऐवजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
         शिवसेनेचे उपनेते तथा खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन देशमुख, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी बैलगाड्या तसेच करपलेले सोयाबीन सोबत आणून पिकांची झालेली अवस्था प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
        मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी ‘या सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वरती पाय’ यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला.
       खासदार अरविंद सावंत म्हणाले की, सरकारच्या जीआरमधून शेतकऱ्यांच्या पदरात ठोस काहीही पडणार नाही. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपये रोख मदत मिळणे आवश्यक आहे. कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना आणखी अडचणीत टाकण्याऐवजी त्यांना कर्जमुक्त करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर सरकारने तातडीने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
        पावसाअभावी पिके करपली असून सोयाबीनसह प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असून ती वेळेवर मिळत नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनीही महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप करत, कोरडा दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात किती मदत मिळणार, याबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही, असे त्या म्हणाल्या. ' उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करून सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली होती. शिवसेनेने राज्यभर आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारला जाग आली, असे त्या म्हणाल्या. पंचनाम्यांच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना अडकवण्याऐवजी सरसकट हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी प्रास्ताविकात शिवसेना कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना सरकारकडून थेट मदत मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार व्यक्त करत आगामी काळात रस्त्यावरचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

       या आक्रोश मोर्चातून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संताप व्यक्त केला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष शेतकऱ्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी पुढील काळातही संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. निवेदन देतांना नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, आमदार सिद्धार्थ खरात, किशोर गारोळे यांच्यासह आदी उपस्थितीत होते.
   या मोर्चात अकोला जिल्हाप्रमुख दातकर, मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, गोपाल बच्छीरे, जिल्हा समन्वयक गजानन धांडे, जिल्हा संघटक सुमित सरदार, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, विलास सुरडकर, बद्री बोडखे, लखन गाडेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाडे, महिला आघाडी संघटना सागरताई पुरी, उर्मिलाताई ठाकरे, जिल्हाप्रमुख विजयाताई खडसन, किसान सेनेचे गजानन उबरहंडे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, श्रीकिसन धोंडगे, निंबाजी पांडव, दादाराव खार्डे, आत्माराम शेळके, राजू बुधवत, प्रा. सिद्धेश्वर आंधळे, सुनील भाग्यवंत, शहरप्रमुख विजय राऊत, श्रीराम झोरे, उल्हास भुसारे, अजय शिवरकर, गजानन जाधव, मोहित राजपूत, मनोज चंदन, श्रीकांत जाधव, श्याम सावळे, सामाजिक न्याय आघाडीचे मिलिंद गवई, संजय शिंदे, शेख रफिक, रामशंकर सोनुने, प्रतीक्षा पिंपळे, भूषण बिरड, राहुल कराळे, आकाश घोडे आणि अनिल नरोटे यांच्यासह हजारो शेतकरी आणि शिवसैनिक सहभा झाले होते.