२६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर होताच रविकांत तुपकर संतप्त * हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या!* २८ सप्टेंबरला राज्यभर हल्लाबोल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!

२६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर होताच रविकांत तुपकर संतप्त
 * हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या!
*  २८ सप्टेंबरला राज्यभर हल्लाबोल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
       महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये म्हणजेच राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी केली. मात्र, सरकारच्या या घोषणेनंतर शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, केवळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, अशी ठाम भूमिका मांडली आहे. सरकारने दुष्काळ जाहीर केला म्हणजे काही मोठा पराक्रम केला, असा त्याचा अर्थ होत नाही. नुसत्या घोषणेने आणि तकलादू उपाययोजनांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्या, अन्यथा आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा देत तुपकर यांनी २८ सप्टेंबर रोजी राज्यभर हल्लाबोल आंदोलनाची घोषणा केली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता शेतकरी धडक देणार असून, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 * पंचनाम्यांची गरज नाही, सरसकट नुकसान झाले आहे ; दौरे, फोटोसेशन आणि रिल्स बंद करा!

         राज्यातील अनेक भागांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले असून, आता पंचनाम्यांच्या प्रक्रियेत वेळ घालवण्याची गरज नसल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. आता पंचनामे करण्याची अजिबात गरज नाही. सगळ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरसकट नुकसान झालेले असताना पंचनाम्यांच्या नावाखाली शेतकऱ्यांना का अडकवता? शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दौरे काढणे, व्हिडिओ काढणे, रिल्स बनवणे हे धंदे आता बंद करा. आमच्या दुःखाचा बाजार मांडू नका. शेतकऱ्यांच्या वेदनांचे प्रदर्शन करण्यापेक्षा त्यांच्या मागण्या मान्य करा आणि प्रत्यक्ष मदत द्या, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर घणाघात केला.

* २८ सप्टेंबरला राज्यभर हल्लाबोल; प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

     सरकारने दुष्काळ जाहीर केला असला, तरी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. सोमवार २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई, दोन हेक्टरची मर्यादा रद्द करून संपूर्ण क्षेत्रासाठी मदत आणि शेतकऱ्यांना ठोस आर्थिक दिलासा या प्रमुख मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता घरात बसण्याची वेळ नाही, मैदानात उतरून संघर्ष करण्याची वेळ आहे. जात, धर्म, पक्ष आणि गट-तट बाजूला ठेवून आपल्या हक्कासाठी एकजुटीने रस्त्यावर उतरा. सरकारने दुष्काळ जाहीर केला, पण आता शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे. हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळवण्यासाठी २८ सप्टेंबरला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक द्या, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे. दुष्काळाच्या घोषणेनंतरही शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, २८ सप्टेंबरच्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनातून सरकारवर किती दबाव निर्माण होतो, याकडे आता राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.