* मुलगा ऋग्वेद ने दिला वडिलांना मुखाग्नी
* तीन राऊंड फायरिंग करत आर्मी जवान सह पोलिसांनी दिली सलामी
चिखली : (एशिया मंच न्यूज )
उत्तराखंडमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना चिखलीचे 36 वर्षीय सुपुत्र हरिदास कापसे यांना कर्तव्यावर वीरमरण आले, ही वार्ता कळताच चिखली शहरातच नाही तर संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली.
वीर जवान यांचे पार्थिव 10 ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी चिखली येथे पोहचले. चिखली शहरातून विरपुत्र हरिदास कापसे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. दुपारी जवान कापसे यांच्यावर चिखली येथील क्रीडा संकुल मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले . अमर रहे, अमर रहे, च्या घोषणा देत चिखली शहर गुंजत होते. यावेळी शाहिद यांना त्यांचा मुलगा ऋग्वेद याने मुखाग्नी दिली तर आर्मी जवान आणि स्थानिक पोलिसांनी जवान कापसे यांना तीन राऊंड फायर करून सलामी दिली. उपस्थित सर्वांनी या वीरपुत्राला शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप दिला.
* आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा वीराला अखेरचा भावपूर्ण निरोप
चिखली विधानसभा मतदार संघातील मौजे शेलसुर येथील जवान हवालदार हरिदास मधुकर कापसे यांनी भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावताना 7 ऑगस्ट रोजी वीरमरण पत्करले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण चिखली मतदार संघ शोकाकुल झाला आहे; मात्र त्यांच्या त्यागाचा अभिमानही तितकाच मोठा आहे.
आज चिखली शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे त्यांचे पार्थिव आले असता अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करत आमदार महाले पाटील यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. हरिदासजी कापसे यांनी भारतीय सैन्यात 15 वर्षे 7 महिने निष्ठेने देशसेवा केली. आपल्या कुटुंबापेक्षा राष्ट्र धर्माला सर्वोच्च स्थान देत भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या वीर सुपुत्राचे बलिदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या पश्चात पत्नी सौ. वृषाली हरिदास कापसे, एक मुलगा, एक मुलगी, वडील मधुकर कापसे आणि दोन भाऊ असा परिवार आहे. या वीर कुटुंबाच्या दुःखात आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणल्या की, मी आणि संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघ ठामपणे त्यांच्या पाठीशी आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणाऱ्या सर्व हक्काच्या सुविधा व मदत वेळेत मिळावी, यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याची माझी जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडेन. वीर जवान यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती सदैव आमच्यासाठी प्रेरणादायी राहील! सोबतच त्यांनी सांगितले की, वीर जवान कापसे यांच्या मूळ गांव शेलसूर येथे भव्य स्मारक शासकीय निधीतून उभारणार असे आश्वासन दिले, ते स्मारक युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांकडून अंत्यसंस्कार प्रसंगी आमदार श्वेताताई महाले पाटील, आमदार संजय गायकवाड, शेतकरी नेते रविकांत तुपकर, न.प.उपाध्यक्षा वैशाली खेडेकर, अप्पर जिल्हाधिकारी खांदे, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅ.डॉ.रुपाली सरोदे, तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्यासह आदि उपस्थित होते.
