* महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात ‘मनोहर’ वार्षिक अंकाचे प्रकाशन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मनोहर अवचार सर हे प्रत्येकाला वेगवेगळ्या भूमिकेत दिसणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची प्रभावी निर्णयक्षमता, दूरदृष्टी आणि समस्या सोडविण्याची हातोटी आजही आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आलेला 'मनोहर' वार्षिक अंक हा केवळ स्मरणिका नसून महाविद्यालयाच्या सामाजिक बांधिलकीचा दस्तऐवज आहे ,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अविनाश गेडाम यांनी केले.
शनिवार ११ जुलै रोजी बुलढाणा येथील महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयात प्राचार्य मनोहर अवचार यांच्या जयंतीनिमित्त 'मनोहर' वार्षिक अंकाचे प्रकाशन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी संस्थापक सचिव मनोहर अवचार यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संस्थात्मक कार्याचा गौरव करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विचारपीठावर संस्थेचे सचिव अक्षय अवचार, ज्येष्ठ प्रा. डॉ.हरीश साखरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विश्वनाथ माळी यांची उपस्थिती होती
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. गेडाम यांनी सांगितले की, वार्षिक अंकात वर्षभर राबविण्यात आलेली विविध जनजागृती शिबिरे, विधायक कार्यक्रम ,संविधान जागर अभियान, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी निमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे अभ्यास दौरे, त्यांचे लेखन तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थी योगेश काकडे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या प्रकाशित ग्रंथांचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
राजू व्यवहारे यांनी मनोगतात सांगितले की, कामात सदैव व्यस्त राहणे हा मनोहर अवचार सरांचा स्थायीभाव होता. त्यांनी त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा आणि समाजाभिमुख दृष्टिकोनाचा आढावा घेतला. जेष्ठ प्रा.डॉ. हरीश साखरे म्हणाले, संस्था उभी करणे ही तारेवरची कसरत असते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मनोहर अवचार सरांनी संस्थेची भक्कम पायाभरणी केली. सर्वांना सोबत घेऊन त्यांनी संस्थेच्या विकासाला नवी दिशा दिली. त्यांच्यासोबत आम्हाला काम करता आले ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्जुन बोकाडे यांनी केले प्रास्ताविक प्रा. डॉ. अस्मिता ठोंबरे , आभार प्रा. संदीप मोठे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयीन कर्मचारी नितीन घुमरे, रवि अवचार, भागवत अवचार, राजेश सोनुने, सुरेश राजगुरू, संतोष गिरे ,रुस्तुम घुगे , अनिल माळी ,एम.एस.डब्ल्यू.भाग 2 चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* अवचार सरांचा वारसा जपूयात : विश्वनाथ माळी
महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष विश्वनाथ माळी यांनी शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत मनोहर अवचार सर यांनी उभारलेले शैक्षणिक कार्य सचिव अक्षय अवचार यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे पुढे जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. स्वतंत्र कार्यभार हा गुण आत्मसात केलेल्या मनोहर अवचार सरांचा वारसा आपण पुढे घेऊन जाऊयात, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
