बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक इंदिरा नगर, येथील रहिवासी विवाहिता फतिमा हलीमा सादीया (उर्फ गुडुना) यांना पती व सासरच्या मंडळींकडून 5 लाख रुपये व फ्लॅट मिळवण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार फतिमा हलीमा सादीया यांनी भरोसा सेल, बुलढाणा येथे दिलेल्या तक्रार अर्जावरून ही बाब उघडकीस आली आहे. लग्नानंतर सुरुवातीचे ३ ते ४ महिने फिर्यादीस सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली. त्यानंतर सासू हलिमा बी शहा आणि सासरे बशीर शहा यांनी घरगुती कामात चुका काढून टोमणे मारणे व शिवीगाळ करणे सुरू केले. दीर शेहजाद शहा, चुलत सासरे अन्वर शहा व मुनीर शहा हे सतत पती शाहीन शहा याला फिर्यादीविरुद्ध भडकावत असत. फिर्यादीच्या वडिलांचे देऊळगाव राजा येथे फ्लॅट्स असल्याने त्यातील एक फ्लॅट नावावर करून देणे आणि मुलाच्या व्यवसायासाठी 5 लाख रुपये माहेरून आणण्याची बेकायदेशीर मागणी आरोपींनी लावून धरली. पती शाहीन शहा याने इतर नातेवािकांच्या चिथावणीवरून फिर्यादीकडे वारंवार 5 लाख रुपये व फ्लॅटची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ केला. मागणी पूर्ण न केल्यास फिर्यादी व तिच्या नातेवाईकांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली, तसेच भावाला फोन करून बहिणीला घेऊन जा असे सांगितले. आरोपींमध्ये बुलढाणा शहरातील इंदिरा नगरमध्ये राहत असलेले शाहीन शहा बशीर शहा (पती), बशीर शहा लुकमान शहा (सासरे), हलीमाबी बशीर शहा (सासू), शेहजाद शहा बशीर शहा (दीर), अन्वर शहा लुकमान शहा (चुलत सासरे), मुनीर शहा (चुलत सासर) यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोहेको दत्तात्रय नागरे करीत आहे.
