वसंतराव नाईक विचार मंच च्या वतीने यू.के. जाधव यांनी केला गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

वसंतराव नाईक विचार मंच च्या वतीने यू.के. जाधव यांनी केला गुणवंत विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते लोकनायक वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त वसंतराव नाईक विचार मंच अमरावती यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा 18 जुलै रोजी येथील विश्राम भावनावर पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त डीवायएसपी यु.के. जाधव हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये बंजारा नेते संजय राठोड,  बंजारा संत महंत मांगीलाल महाराज, चंपालाल महाराज,  बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दबंग ठाणेदार संग्राम पाटील यांची उपस्थिती होती. 
           यावेळी सर्वप्रथम सेवानिवृत्त डीवायएसपी युके जाधव यांचा बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने तसेच बंजारा समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आले. यु.के. जाधव यांनी आपल्या भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते बोलताना पुढे म्हणाले की, मला सेवानिवृत्त व्हायला आज नऊ वर्ष होत आहे तरीपण बुलढाणा जिल्ह्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असल्याने मला वाटत नाही की, मी सेवानिवृत्त झालो आहे. बुलढाणा जिल्हावाशी यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास हाच माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतर समाजासाठी काहीतरी कार्य करावे म्हणून मी वसंतराव नाईक विचार मंच ची स्थापना करून समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. तरुण पिढीने नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनायला पाहिजे, असेही यावेळी यु. के. जाधव यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले.
          यावेळी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी आपल्या भाषणातून यु.के. जाधव यांचा आदर्श घेऊन आम्ही काम करत आहोत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला काम करण्याची जी पद्धत आहे ती शिकवली. त्यामुळे साहेबांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो.     
        बंजारा नेते संजय राठोड यांनी आपल्या भाषणातून तरुण पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. तरुण पिढीने शिक्षण घेऊन यु.के. जाधव यांचे सारखे अधिकारी होऊन नावलौकिक करावे, असे उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले.
        यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोतमारा येथील रोशन वामन चव्हाण यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची पीएसआय पदी निवड झाली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात निखिल वामन चव्हाण, बँकिंग क्षेत्रात वैभव प्रेमकुमार राठोड तसेच बुलढाणा ते पंढरपूर सायकल वारी करणारे विठ्ठल चव्हाण, मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळविलेल्या सरलाताई राठोड, रामेश्वर चव्हाण यांची वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. धीरज जाधव यांची मेहकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला शहरातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.