उपवर्गीकरणाच्या विरोधात २९ जुलैला बुलढाण्यात महामोर्चा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा विरोध करण्यासाठी २९ जुलै रोजी बुलढाण्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे. जिजामाता प्रेक्षागार येथून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त आंबेडकरी समाज व अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीने आज 20 जुलै रोजी स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषेद केले आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक संघर्षातून भारतीय संविधानामध्ये कलम ३४१ नुसार आरक्षण म्हणजे प्रतिनिधीत्वाचा अधिकार मिळाला आहे. या अधिकारामुळे देशातील समस्त अनुसूचित जातींची हजारो वर्षांची गुलामी नष्ट केली. आज वर्तमानात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करुन जाती-जातींमध्ये फुट पाडून आरक्षण संपविण्याचे व गैर संविधानीक क्रिमीलेअर लावण्याचे षडयंत्र सुरु आहे. ज्यामुळे आरक्षणाचा अधिकार कमकुवत होवून आरक्षण संपुष्टात येणार आहे. येणाऱ्या पिढिच्या भविष्यासाठी व संविधानिक हक्क व अधिकार वाचविण्यासाठी, उपवर्गीकरण्याच्या विरोधात बुलढाणा जिल्हास्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
* महामोर्चातील प्रमुख मागण्या :
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, शासनाने नियुक्त केलेल्या माजी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल तात्काळ सार्वजनिक करून. गैर संविधानिक एक सदस्य अनंत बदर समिती रद्द करण्यात यावी, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला महाराष्ट्रातील ५९ जातींपैकी ५८ जातींचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. त्यामुळे गैर संविधानिक उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती समाजाची जातनिहाय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा व्यापक सर्वेक्षण करून त्याचा अहवाल जाहीर करण्यात यावा. तसेच त्या अहवालाच्या आधारे अनुसूचित जातींसाठी शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्व अनुशेष (Backlog) पदे तात्काळ भरण्यात यावीत, अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृहे, कौशल्य विकास योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच उच्च शिक्षणाच्या सुविधा वाढवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
या महामोर्चाला सरसेनानी आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, बबनराव घोलप, चंद्रकांत हांडोरे, जोगेंद्र कवाडे, आ. राजकुमार बडोले, आ. सिद्धार्थ खरात यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
