सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बुलढाणेकर रस्त्यावर....* साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात तीव्र संताप!

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बुलढाणेकर रस्त्यावर....
* साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारविरोधात तीव्र संताप!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून वाढता पाठिंबा मिळत असताना त्यांच्या उपोषणाच्या १९ व्या दिवशी गुरुवार १६ जुलै रोजी बुलढाण्यात साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी रस्त्यावर उतरले. जिल्हा परिषद परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर चीआय सपोर्ट सोमन वांगचुक ' असे फलक हातात घेत आंदोलनकर्त्यांनी तोंडाला व हाताला काळ्या फिती बांधून केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
         आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित राजपूत यांनी, सोनम वांगचुक हे देशहितासाठी लढणारे भारताचे खरे सुपुत्र आहेत. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे ही लोकशाहीची गळचेपी असून पंतप्रधानांनी तात्काळ हस्तक्षेप करून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.
        सामाजिक कार्यकर्त्या शाहिना पठाण, साहित्यिक सुरेश साबळे, शाहीर डी. आर. इंगळे आणि प्रतिभा भुतेकर यांनी सोनम वांगचुक यांच्या त्यागाची आणि पर्यावरण रक्षणासाठीच्या संघर्षाची माहिती देत सरकारवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी उपोषण तातडीने सोडवण्याची मागणी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
        डॉ. आशिष खासबागे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत, सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला हा खेळ तात्काळ थांबवावा, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. कवी विशाल मोहिते यांनी, सरकारने आता मौनाची आणि बघ्याची भूमिका सोडून सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, असे ठणकावून सांगितले.
       या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ आराख , गणेश निकम, कुणाल पैठणकर, पंजाबराव गायकवाड, सुजित देशमुख, मनसे तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, पत्रकार संदीप वानखेडे, नितीन कानडजे, राम हिंगे, अभिषेक वरपे यांच्यासह अनेक पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.