निष्ठावंतानो चिंता करू नका, येणारा काळ उद्धव ठाकरे साहेबांचाच : जालिंदर बुधवत * राममंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड भाजपला करावीच लागेल : जयश्रीताई शेळके

निष्ठावंतानो चिंता करू नका, येणारा काळ उद्धव ठाकरे साहेबांचाच : जालिंदर बुधवत 
* राममंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड भाजपला करावीच लागेल : जयश्रीताई शेळके 
* उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा 
* रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद..
* ५ हजारावर विद्यार्थ्यांना खाऊवाटप, 
* रुग्णांना फळवाटप, मूकबधिर विद्यालय, सेवा संकल्प येथे गरजूंना मिष्ठांन्न भोजन   
* वृक्षारोपण, शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप
* जगदंबा देवी मंदिरात आरती
* गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप 


बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      नीट पेपर फुटी प्रकरणात न्याय आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर मोदी सरकारने दिल्लीत निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे राहिले. जवळपास महिनाभर चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलना समोर अखेर केंद्र सरकार झुकले. देशभरामध्ये एक वेगळं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. रात्र झाली की पुन्हा दिवस उगवतो. कुणीही येथे सत्तेचा अमर पट्टा लावून आलेला नाही. त्यामुळे निष्ठावंतांनी चिंता करण्याची गरज नाही, येणारा काळ हा उद्धव ठाकरे साहेबांचा आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा राहणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले.

        शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. उद्धव ठाकरे साहेबांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्राम दैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती करण्यात आली. तत्पूर्वी २४ जुलै रोजी शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप आणि बुलढाणा तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद शाळेतील ५ हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. २६ जुलैला सकाळी सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप , मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर बुलढाणा येथील गर्दे वाचनाच्या सभागृहात रक्तदान शिबिर घेण्यात आले. दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळावा देखील पार पडला.

        यावेळी प्रवक्ता सौ. जयश्रीताई शेळके, सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने सर , जिल्हा समन्वयक गजानन धांडे, उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर, विधानभा संघटक सुनील घाटे,
बुलढाणा तालुका प्रमुख विजय इतवारे, मोताळा तालुका प्रमुख विजय इंगळे, गजानन उबरहंडे, महिला आघाडीच्या सौ.प्रतीक्षा पिंपळे, सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

       सुरुवातीला छत्रपती श्री. शिवाजी महाराज आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. 

       यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत म्हणाले की, शिवसेनेमुळे सामान्य माणसाला सत्ता पदे मिळाली. उद्धव ठाकरे साहेब हे सरळ स्वभावाचा राजकारणातील देव माणूस आहे. गोरगरिबांच्या न्यायासाठी शिवसेना काम करत असते. सत्ता येत जात असते. शिवसेनेचा जन्म कधीही सत्तेसाठी झालेला नाही. निष्ठावंतांचा आजचा मेळावा येणाऱ्या काळामध्ये संघटनेला नवी ऊर्जा देणारा ठरणार आहे. सुरू असलेल्या या एसआयआर मध्ये आपला बूथ, आपलं गाव काळजीपूर्वक सांभाळून मतदारांचे अर्ज बीएलओ यांच्याकडून कडून भरून घ्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला अधिक जोमाने कामाला लागायचे आहे असे आवाहन देखील जालिंदर बुधवत यांनी केले.

* राम मंदिरातील चोरीच्या पापाची परतफेड सत्ताधारी भाजपला करावीच लागेल : जयश्रीताई शेळके 

       प्रभू श्रीरामचंद्र यांच्या नावावर राजकारण करून सत्तेत आलेल्या भाजप सरकारला कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणातील पापाची परतफेड करावीच लागणार आहे, असा घणाघाती हल्ला राज्य प्रवक्ता सौ. जयश्रीताई शेळके यांनी यावेळी केला. उद्धवसाहेबांनी कोरोना सारख्या काळामध्ये कुटुंबप्रमुख म्हणून महाराष्ट्र सांभाळला. सहा खासदारांनी गद्दारी केली. त्यांच्या मतदार संघात उद्धवसाहेबांनी केलेला दौरा निष्ठेची ताकद दाखवून गेला आहे. आज महाराष्ट्रात देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल आहे. सामाजिक काम करणाऱ्यांना आणि पत्रकारांना देखील धमकवल्या जात आहे. तरुणाई मध्ये सरकारबद्दल धगधगता असंतोष आहे. जंतर मंतर वरील आंदोलनात तरुणांच रक्त लाठीहल्ल्यामध्ये रस्त्यावर सांडले गेले. या आंदोलनाला उद्धव साहेबांनी क्षणाचाही विलंब न करता पाठिंबा दिला. तरुणाईच्या आंदोलनापुढे केंद्र सरकार झुकले. त्यामुळे केंद्र सरकारच्या सत्तेचा उलट्या गिनतीचा काळ सुरू झाला आहे, असेही जयश्रीताई शेळके म्हणाल्या.

       शिवसेना ही संघर्षावर उभी राहिली आहे. शेतकरी ,बेरोजगार, उद्योग आणि सामान्यांच्या प्रश्नावर शिवसेना कायम लढा उभारत आली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचा समाज हिताचा विचार पुढे नेऊन तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू आहे. उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी ही सरसकट दिली होती. दिलेला शब्द कर्तव्य निष्ठेने पाळणारा हा माणूस असल्याचे सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने सर म्हणाले. 

      दिल्लीतील जंतर-मंतर वरील आंदोलनामुळे "हिम्मत हारू नका. कुणीही अजेय नाही" ही भावना जनमानसामध्ये बळावली आहे. या विद्यार्थ्यांवर कुठलीही ईडी, सीबीआय चालू शकत नाही. त्यामुळे प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. अन्यायाच्या विरुद्ध सगळ्यात पहिले मातोश्रीच्या आदेशावरून शिवसेना धावून जाते. या विद्यार्थ्यांच्या पाठीशी देखील उद्धव ठाकरे साहेब हेच पहिल्यांदा उभे राहिले. उद्धव साहेबांच्या रूपाने परिपक्व, संयमी नेतृत्वाला पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावे लागणार आहे, असे गजानन धांडे म्हणाले. किसान सेनेचे उपजिल्हाप्रमुख गजानन उबरहंडे यांनी देखील महाविकास आघाडीच्या काळातील उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आठवण याप्रसंगी करून दिली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. 
        प्रस्ताविक लखन गाडेकर यांनी केले. बाहेर सुरू असलेल्या भर पावसातही गर्दे सभागृह निष्ठावंत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भरगच्च होता.