दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध * राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी डफ वाजवून सरकारविरोधी घोषणाबाजी

दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध 
 * राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी डफ वाजवून सरकारविरोधी घोषणाबाजी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       ठाकरेंच्या शिवसेनेने आज 22 जुलै रोजी भर पावसात केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र निषेध नोंदवत राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी डफ वाजवून सरकारविरोधी घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे शहरातील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने बुलढाण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले . भर पावसातही उत्साहाने सहभागी झालेल्या शिवसैनिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी 'केंद्र सरकार मुर्दाबाद', 'विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज बंद करा' अशा घोषणा दिल्या. 
  जयश्रीताई शेळके यांनी डफ वाजवत आक्रमक पद्धती नेतृत्व केले . आंदोलकांनी रास्ता रोको करत वाहतुकीला अडथळा आणला, ज्यामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली. आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचं दिसताच पोलिसांनी कारवाई करत अनेक शिवसैनिकांना ताब्यात घेतले. आक्रमक झालेल्या शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये बराचवेळ राडा पाहायला मिळाला. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवसैनिकांनी आपल्या मागण्या पुढे रेटल्या. शेवटी पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलकांना हटवत प्रमुख नेत्यांसह अनेकांना ताब्यात घेतले .

           जयश्रीताई शेळके म्हणाल्या, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा लोकशाहीचा अपमान आहे. केंद्र सरकार विद्यार्थी, शेतकरी आणि सामान्य माणसाच्या विरोधात काम करत आहे. आम्ही याचा सातत्याने निषेध करणार आहोत. पावसातही आमचे आंदोलन थांबणार नाहीत. या आंदोलनात जिल्हा प्रमुख जालिंदर भाऊ बुधवत, प्रा. डी. एस. लहाने यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी करण्यासाठी प्रयत्न केला, तरीही काही काळ तणावपूर्ण स्थिती होती. सध्या ताब्यात घेतलेल्या शिवसैनिकांना शहर पोलीस स्टेशनला स्थानबद्ध केले आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.