शिवसाई ज्ञानपीठ स्कूल बुलढाणा येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी

शिवसाई ज्ञानपीठ स्कूल बुलढाणा येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
            शहरातील शिवसाई ज्ञानपीठ स्कूल येथे थोर स्वातंत्र्य सेनानी भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली व प्रतिमा पूजन करण्यात आले.
        याप्रसंगी शाळेचे प्राचार्य प्रमोद मोहरकर सर, उपप्राचार्या अपेक्षा बिल्लारी, सुपरवायझर बंगाळे मॅडम, कॉर्डिनेटर गायकवाड मॅडम  उपस्थित होत्या. यावेळी अथर्व मुरकुट, स्वरा दांडगे, दिव्या भारंबे, नेहा पंडित या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांच्या तेजस्वी विचारांना उजाळा दिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळवणारच या त्यांच्या सिंहगर्जनेची आठवण करून दिली. यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना शाळेचे प्राचार्य मोहरकर सर यांनी लोकमान्य टिळकांच्या सामाजिक, राजकीय, आणि शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली. केवळ इतिहासाची उजळणी न करता टिळकांचा स्वाभिमान आणि कठोर परिश्रम आजच्या तरुण पिढीने आपल्या आयुष्यात कसे अवलंबवावे यावर त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.              उपप्राचार्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकमान्य टिळक हे केवळ स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर ते एक महान पत्रकार, प्रखर विचारवंत आणि दूरदृष्टी नेते होते. त्यांनी वृत्तपत्रे आणि सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून समाजात अन्यायाविरुद्ध लढण्याची व देशभक्तीची ज्योत तेवत ठेवली. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या स्वाभिमानाचा कठोर परिश्रमाचा, निर्भय वृत्तीचा आदर्श आपल्या आयुष्यात अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्फूर्तीदायक वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेचे श्रेय कार्यक्रमाच्या संचालिका जयश्री शेळके मॅडम, हेमलता जाधव मॅडम, वाळके मॅडम यांना मिळते.