दिल्लीत विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा बुलढाण्यात तीव्र निषेध
* राष्ट्रपतींकडे विविध मागण्यांचे निवेदन; दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी
बुलढाणा : ( एशिया मंच न्यूज)
न्याय्य मागण्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित अमानुष लाठीहल्ल्याचा बुलढाण्यातील संवेदनशील नागरिकांनी तीव्र निषेध नोंदविला. या घटनेच्या निषेधार्थ स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करून मूक रॅली काढण्यात आली. यानंतर भारताच्या महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध मागण्यांचे निवेदन आज 23 जुलै रोजी देण्यात आले. या मूक मोर्चात विद्यार्थ्यांच्या हातात बोलके फलक होते.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मागील २० जुलै रोजी दिल्लीत न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काही जण गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना दीपिका सिंग या विद्यार्थिनीचा अपघाती मृत्यू झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लोकशाही मार्गाने आणि अहिंसक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार करणे, हे त्यांच्या न्याय मागण्याच्या घटनात्मक अधिकारावर गदा आणणारे आहे. या घटनेमुळे भारतीय संविधानातील लोकशाही मूल्यांना धक्का बसला असून देशभरातील नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींकडे विविध मागण्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याची सखोल चौकशी करून दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांचे भविष्य खराब करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच घटनेच्या दिवशी पोलिसांच्या ताफ्यातील साध्या वेशातील व्यक्ती तसेच कथित समाजकंटकांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करावी, पेपरफुटी करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर व विशेष कायदा करावा. दोषींना जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी,
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दडपशाहीने पाहण्याऐवजी लोकशाही मार्गाने संवाद साधला पाहिजे. संविधानिक मूल्यांचे रक्षण करून विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी शेकडो विद्यार्थी, पालक यांच्यासाह बुलढाण्यातील संवेदनशील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
