मुंबईत शेतकऱ्यांचा एल्गार यशस्वी !
* आंदोलनाच्या तडाख्याने सरकार झुकले; मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकरांची निर्णायक बैठक !
मुंबई : (एशिया मंच न्यूज )
सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात मुंबईत उभारलेल्या शेतकरी एल्गाराने अखेर सरकारला झुकवले. विधानभवनावर दिलेली धडक, सातबाऱ्यांचा वर्षाव, सोयाबीन-कापूस उधळत सरकारविरोधात संतापाचा केलेला स्फोट, त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह दोनशेवर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेणे, मंत्रालयासमोरील दोन झाडांवर गळ्यात फास अडकवून आंदोलन आणि मरीन ड्राईव्हवर शेतकऱ्यांनी समुद्रात उतरून केलेला संघर्ष अशा सलग घडामोडींनी सरकार आणि प्रशासनाची अक्षरशः झोप उडवली. वाढत्या दबावामुळे अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याचे कळविले.
गुरुवारच्या सकाळपासूनच विधानभवन परिसर रणांगण बनला होता. जून महिन्यातील अन्नत्याग आंदोलनावेळी सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधानभवनावर धडकले. कडेकोट पोलीस बंदोबस्तालाही न जुमानता आंदोलनकर्त्यांनी विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न केला. सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने भिरकावण्यात आल्या, तर सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. काही काळ संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
* आंदोलन चिघळले :
या आंदोलनानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेले. मात्र, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारलाच महागात पडल्याचे दिसून आले. तुपकर ताब्यात गेल्यानंतर आंदोलन आणखी आक्रमक झाले.
मंत्रालयासमोरील दोन उंच झाडांवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चार कार्यकर्ते चढले. गळ्यात फास अडकवून सरकारने बैठक जाहीर करेपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने पोलीस, अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. अनेक तास प्रयत्न करूनही आंदोलक खाली येण्यास तयार नव्हते. एकीकडे झाडांवर जीवघेणे आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे काही शेतकरी मरीन ड्राईव्ह परिसरातील समुद्रात उतरले. त्यामुळे मंत्रालय, विधानभवन आणि संपूर्ण परिसरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेली.
* जीवाची बाजी लावून झाडांवर आंदोलन; अख्खी यंत्रणा हादरली!
मुंबईतील आंदोलनाला सर्वाधिक नाट्यमय वळण मंत्रालयासमोरील झाडांवरील आंदोलनामुळे मिळाले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे चार कार्यकर्ते दोन उंच झाडांवर चढले आणि गळ्यात फास अडकवून सरकारने तातडीने बैठक जाहीर करेपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिल्याने पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणांची अक्षरशः धावपळ उडाली. अनेक तास समजावण्याचे प्रयत्न करूनही कार्यकर्ते झाडावरून खाली येण्यास तयार नव्हते. या जीवघेण्या आंदोलनामुळे मंत्रालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्टवर गेली. अखेर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी दूरध्वनीवरून कार्यकर्त्यांना आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे,लढणारी माणसं टिकली पाहिजेत, असे भावनिक आवाहन तुपकरांनी केले. त्यानंतर कार्यकर्ते झाडावरून खाली उतरले आणि अनेक तास सुरू असलेले हे थरारक आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
* एकाच वेळी उभ्या राहिलेल्या आंदोलनांमुळे दबाव..
एकाच वेळी उभ्या राहिलेल्या आंदोलनांमुळे सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला. सलग अनेक तास सुरू असलेल्या संघर्षानंतर अखेर सरकारने चर्चेची भूमिका स्वीकारली. मंत्री गिरीश महाजन यांनी रविकांत तुपकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निश्चित झाल्याची माहिती दिली. बैठकीत सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, शेतमालाला हमीभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
* शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणण्यात यश
जून महिन्यातील अन्नत्याग आंदोलनानंतरही सरकारने दिलेले बैठकीचे आश्वासने पूर्ण न झाल्याचा आरोप करत रविकांत तुपकर यांनी पुन्हा मुंबईत संघर्षाची ठिणगी पेटवली.विधानभवनापासून मंत्रालय आणि मरीन ड्राईव्हपर्यंत आंदोलनाचा विस्तार झाला. अधिवेशन काळात शेतकऱ्यांचे थेट विधानसभवनाच्या गेटवर धडकणे,तुपकरांच्या नेतृत्वातील आक्रमक आंदोलने यामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यात रविकांत तुपकर यांना यश मिळाले आहे.
वृत्त लिहितीपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविकांत तुपकर आणि शिष्टमंडळा सोबतची बैठक सुरू होती. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतकरी सन्मान निधी, शेतमालाला हमीभाव आणि इतर मागण्यांबाबत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
