* जिल्हा शल्य चिकित्सकांनी दाखवली तत्परता
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील रक्तपेढीमध्ये (ब्लड बँक) सद्या सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच रक्तदान स्वीकारले जाते. यामुळे दुपारी २ नंतर येणाऱ्या रक्तदात्यांची गैरसोय होत असून, गंभीर व अपघातग्रस्त रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता रक्तपेढीची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी 'अल मदीना एज्युकेशन फाउंडेशन'चे अध्यक्ष नदीम एस. शेख, प्रो. डॉ. मो. अरशद यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. बुलढाणा जिल्ह्यात हजारहून अधिक लहान बालक थॅलेसेमिया या आजारानेग्रस्त आहेत. या बालकांना दर १५ दिवसांनी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. अशा रुग्णांच्या पालकांना वेळेवर रक्तदाते शोधताना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या मुश्किलीने रक्तदाता मिळतो, परंतु दुपारी २ वाजेनंतर जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेत रक्त घेण्याची व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण होते.
एकीकडे गंभीर रुग्ण, अपघातग्रस्त आणि थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी रक्ताची तातडीची गरज असते, तर दुसरीकडे रक्तदानाची वेळ मर्यादित असल्याने रक्तदाते असूनही रक्तदान करता येत नाही. हा विसंगत कारभार तातडीने सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. दुपारी 2 नंतर रक्तदान घेण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याची गंभीर दखल घेऊन रक्तपेढीची वेळ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वाढवावी. प्रशासनाने यावर तातडीने निर्णय न घेतल्यास आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन इशारा देण्यात आला होता, असे नदीम एस. शेख अध्यक्ष, अल मदीना एज्युकेशन फाउंडेशन, बुलढाणा यांनी सांगितले.
* जिल्हा शल्य चिकित्सकांचा ऑन द स्पॉट निर्णय :
बुलढाणा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी या मागणीची गंभीर दखल घेत आजपासूनच 10 ते 5 पर्यंत रक्तपेढी सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याबद्दल नदीम शेख यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी घेतलेल्या तडकाफडकी निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचे आभार सुध्दा व्यक्त केले.
