लोणारच्या महोत्सवासाठी दहा लाखांचा निधी मंजूर
* आ. सिद्धार्थ खरात यांची माहिती
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणार सरोवराच्या पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. लोणार सांस्कृतिक महोत्सवासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली.
आमदार सिद्धार्थ खरात यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे लोणार येथे पर्यटन, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी लोणार फेस्टिव्हल आयोजित करण्याची मागणी केली होती. लोणारचे जागतिक पर्यटनदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेऊन मंत्री शेलार यांनी या महोत्सवासाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
याबाबत आमदार सिद्धार्थ खरात यांनी मंत्री आशिष शेलार यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की, लोणारसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळासाठी हा निधी महत्त्वाचा असला तरी भव्य स्वरूपात महोत्सव आयोजित करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. त्यासाठीही राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, पावसाळ्याचा विचार करून लोणार सांस्कृतिक महोत्सव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून लोणारच्या पर्यटन, संस्कृती, इतिहास आणि स्थानिक कला-संस्कृतीला व्यापक प्रसिद्धी मिळणार असून, राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
