साखळी बु. येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात* शिक्षक आणि पालक एकत्र आले तर कोणतच मूल मागे राहणार नाही : डॉ. शरद जुमडे

साखळी बु. येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात
* शिक्षक आणि पालक एकत्र आले तर कोणतच मूल मागे राहणार नाही : डॉ. शरद जुमडे 
बुलढाणा :  (एशिया मंच न्यूज )
           जि. प. हायस्कूल, साखळी बु. येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या निमित्ताने 'शाळा प्रवेशोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इंडियन डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष तथा शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. शरद जुमडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मुलांना शाळेत पाठवून पालकांची जबाबदारी संपत नाही. त्यांच्या दप्तरात डोकावून बघा, त्यांच्या गोष्टी ऐका, शिक्षक आणि पालक एकत्र आले तर कोणतच मूल मागे राहणार नाही. यासोबतच त्यांनी शिक्षण, आरोग्याचे महत्त्व पटवून देत शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.

          नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेच्या प्रांगणात खास 'सेल्फी पॉईंट' उभारण्यात आला होता. ज्ञान, संस्कार, प्रगती हे ब्रीदवाक्य असलेल्या या सेल्फी पॉईंटवर शिक्षण हेच आमचे ध्येय, उज्ज्वल भविष्य हेच आमचे स्वप्न,  आणि आजचा सेल्फी उद्याच्या सुंदर आठवणी! अशा प्रेरणादायी ओळी लिहिल्या होत्या.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयमाला कवळे (फासे) मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला मुख्याध्यापक आर. आर. सय्यद, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, पालक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी आणि पालकांनी सेल्फी पॉईंटवर फोटो काढून आनंद व्यक्त केला. 

        यावेळी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत येण्याचे व मन लावून अभ्यास करण्याचे आवाहन केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे प्रवेशोत्सवाला वेगळीच रंगत आली असून पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या या प्रयत्नांचे कौतुक केले.