शिवराज्याभिषेक मध्ययुगीन काळातील स्वतंत्र दिवस होय - संजय खांडवे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिवराज्याभिषेक दिनाचे महत्त्व महाराज सिंहासनाधीश्वर झाले एवढ्या पुरते मर्यादित नाही, तर बहुजनांना स्वत्वाची जाणीव करून देणारा हा दिवस आहे. बखरकार सभासद म्हणतो.. मऱ्हाठा पातशहा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मूलतत्त्वांची पेरणी करनारा व मध्ययुगीन काळातील बहुजनांचा तो पहिला स्वातंत्र्य दिवस असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक संजय खांडवे यांनी केले.
३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज बुलढाणा येथे मराठा सेवा संघा मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना येथील संगम चौकात अभिवादन करण्यात आले. नंतर मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संत गाडगे बाबा प्रबोधन कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रमोद टाले, मराठा इतिहास कक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री संजय खांडवे,
मराठा सेवा संघ बुलढाणा (दक्षिण) जिल्हाध्यक्ष शिवश्री रविकांत काळवाघे, राज्य सहसचिव शिवश्री डॉ मनोहर तुपकर, शिवश्री इंजी गुलाबराव कडाळे व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमोद टाले यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. शिवराज्याभिषेक दिन तिसरा महत्त्वाचा दिवस असून श्रद्धेचा तितकाच अस्मितेचा दिवस असल्याचे ते म्हणाले. इतिहास अभ्यासक संजय खांडवे यांनी आपल्या व्याख्यानात महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. शिवराज्याभिषेक दिन शहाजीराजांनी आखलेल्या लष्करी शिस्तबद्ध योजनेतील टप्पा असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराज पुण्याला आले त्यावेळेस शहाजीराजांनी त्यांना अमात्य दिले.अमात्य म्हणजे मंत्री महाराज पुण्यात परतले कारकिर्द सुरू व्हायची होती. तेव्हा त्यांच्यासोबत मंत्रीगण होते, याचा अर्थ काय? मंत्रिमंडळाची योजना देखील आधीच तयार झाली होती. शिक्का होता म्हणजे अधिकार होता. ध्वज देखील होता, पुढे काय होणार याची पूर्ण योजनाच तयार होती. त्यानुसार घडले असल्याचे दिसते. छत्रपती झाल्यानंतर महाराजांना राजकीय, सामाजिक मान्यता मिळाली. विदेशी इंग्रजांनी मुजरे घातले इतका महत्त्वाचा हा दिवस होता. बहुजन समाजासाठी हा दिवस म्हणजे पहिला स्वतंत्र दिन आहे. मराठा सेवा संघाने रायगडावर प्रथम हा दिवस साजरा केला. आता राज्यात आणि देशांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात असल्याचे शिवश्री खांडवे म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव कडाळे, रविकांत काळवाघे ,डॉक्टर मनोहर तुपकर यांनी देखील विचार मांडले.
कार्यक्रमासाठी संजय विखे, प्रल्हाद ताठे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवशंकर भारसाकले, पत्रकार गणेश निकम, सुनील भुतेकर, गजानन पडोळ, दत्ता शेळके, अभय पाटील, प्रा. डॉ. जे जे जाधव, दीपक चिंचोले, नितीन उबरांडे, पी. एस. मिसाळ, डॉक्टर रमेश पाचरणे आदी उपस्थित होते.आभार अभय पाटील यांनी मानले. सामूहिक जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
