किरकोळ वादातून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल* रहिम शहा गंभीर जखमी : वरवंड येथील घटना

किरकोळ वादातून कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
* रहिम शहा गंभीर जखमी : वरवंड येथील घटना 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
           किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हिंसेत होऊन एका तरुणावर कुऱ्हाडीने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना ६ जून रोजी सकाळी १०  वाजेच्या सुमारास वरवंड येथे घडली . या हल्ल्यात रहिम शहा इस्माईल शहा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बुलढाणा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
            फिर्यादी रफिक शहा नुरशहा रा. वरवंड यांनी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांचा आतेभाऊ रहिम शहा इस्माईल शहा हा गावातील एका बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून कामाला गेला होता. सकाळी अंदाजे १० वाजेच्या सुमारास वरवंड येथील बस स्थानकाजवळ रहिम शहा आणि गावातीलच अर्जुन श्रीराम इंगळे यांच्यात काहीतरी कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर दोघेही तिथून निघून गेले. त्यानंतर अवघ्या पाऊण तासात, म्हणजे सकाळी १०:४५ वाजेच्या सुमारास, बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर आरोपी अर्जुन इंगळे याने रहिम शहाला पुन्हा गाठले व त्यांच्यात पुन्हा भांडण सुरू झाले. वाद विकोपाला गेल्याने आरोपी अर्जुन इंगळे याने स्वतः जवळील कुऱ्हाडीने रहिम शहाच्या डोक्यावर वार केले. या हल्ल्यात रहिम शहाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाल्याने तो जागीच कोसळला. मी तुला संध्याकाळपर्यंत जीवाने मारून टाकतो, अशी धमकीही आरोपीने यावेळी दिली.
       घटनेच्या वेळी उपस्थित असलेले सतिश संतोष बरडे, सतिश सुधीर इंगळे, जगदिश नामदेव जेवघाले व उज्वला मनोज खेडेकर यांनी प्रसंगावधान दाखवून तात्काळ मध्यस्थी केली. 
      दरम्यान रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रहिम शहाला त्याचे मित्र सतिश बरडे, सतिश इंगळे यांनी मोटारसायकलने तातडीने वरवंड येथील स्थानिक दवाखान्यात नेले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला तात्काळ बुलढाणा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी रफिक शहा यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी अर्जुन श्रीराम इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.