* जळगाव जामोदमधील राजुरा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणेदारांसोबत चर्चा
जळगाव जामोद : (एशिया मंच न्यूज )
राजुरा शिवारात घडलेल्या तरुणीच्या बहुचर्चित हत्याकांडाच्या तपासावरून शिवसेना उबाठा राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी पोलीस यंत्रणेवर हल्ला चढवला. तरुणीचे खरे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. निष्पाप बापलेकांना नाहक गुन्ह्यात अडकवले असून ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद पोलीस स्टेशनला भेट देऊन जयश्रीताई शेळके यांनी पोलीस निरीक्षक बागुल यांच्यासोबत चर्चा केली. तसेच या प्रकरणाचा तपास करीत असलेले मेहकरचे पोलीस उपअधीक्षक खाडे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत तपासाची माहिती घेतली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या निष्काळजी आणि दिशाभूल करणाऱ्या तपासामुळे मध्यप्रदेशातील एका निष्पाप आदिवासी पिता-पुत्राला खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, जिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता ती तरुणी जिवंत समोर आल्यानंतर संपूर्ण तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या.
या प्रकरणात अजूनही मृत तरुणीची ओळख पटलेली नाही. तिचे खरे मारेकरी मोकाट आहेत, ही बाब अधिक गंभीर आहे. निष्पापांना आरोपी ठरविण्यापेक्षा खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे हेच तपास यंत्रणेचे कर्तव्य असून या प्रकरणाचा नि:ष्पक्ष आणि सखोल तपास होऊन मृत तरुणीला न्याय मिळावा, अशी अपेक्षा जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केली आहे.
