सरकार चालढकल करतंय ! * आमची लढाई थांबणार नाही : राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरेल - तूपकरांनी सरकारला ठणकावले

सरकार चालढकल करतंय ! 
* आमची लढाई थांबणार नाही : राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरेल - तूपकरांनी सरकारला ठणकावले 
बुलढाणा  : (एशिया मंच न्यूज )
          राज्य सरकारने ३० जूनपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा शब्द दिला होता. मात्र काल, विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही तारीख पुढे ढकलत असल्याचे सांगितले आहे. यावरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले असून अतिशय संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मुळात राज्य सरकारला कर्जमाफी करायचीच नाही. सरकार चालढकल करत आहे. केवळ १० ते १५ टक्केच शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारला करायची आहे. कमीत कमी शेतकरी कसे कर्जमाफी योजनेत बसतील असा छुपा अजेंडा सरकारचा असल्याचा गंभीर आरोप तुपकरांनी केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांमध्ये गट –तट निर्माण करून भांडण लावायचे हासुद्धा यामागचा सरकारचा अजेंडा असल्याचे तुपकरांनी म्हटले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. कर्जमाफीच्या निर्णयासंदर्भात सरकारने फिरवाफिरवी केल्यास लवकरच राज्यभरातल्या शेतकऱ्यांचे जन आंदोलन उभे करू, राज्यभरातला शेतकरी लवकरच रस्त्यावर उतरलेला सरकारला दिसेल असेही तुपकरांनी सरकारला ठणकावले आहे.

   राज्य सरकारने ३० जूनपर्यंत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र काल २८ जुनला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तारीख पुढे ढकलत असल्याचे विधानसभेत सांगितले. सरकारच्या या घोषणेबद्दल राज्यभरातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत.                     Nकर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार चालढकल करत आहे. आता पुढची तारीख दिली, त्यानंतर पुन्हा वेगळी तारीख दिली जाईल. २०२९ पर्यंत शेतकऱ्यांना झुलवत ठेवण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप तुपकर यांनी केला आहे. 

* मुदत संपली, आता आंदोलनाचे हत्यार..
 
       सरसकट विनाअट विनशर्त कर्जमुक्ती, पिकविमा यासह अन्य मागण्यासाठी रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात १५ जुन पासून अन्नत्याग आंदोलन केले होते. तुपकर यांची प्रकृती खालावल्यानंतर राज्यभरात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले होते. ठिकठिकाणी जाळपोळीसह उग्र आंदोलनाच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सरकारच्यावतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुलढाण्यात येऊन रविकांत तुपकर यांना कर्जमुक्ती संदर्भात राज्य सरकार सोबत बैठक लावण्यासाठी सुट्ट्या संपल्यानंतरच्या ५ –६ दिवसांचा वेळ मागितला होता. शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आणि राज्य सरकारच्या विनंतीचा मान ठेवत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरात उपचार सुरू होते. काल त्यांना डिस्चार्ज झाला आहे, तब्येत ठीक असली तरी अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी काही दिवस सक्तीची विश्रांती सांगितली आहे. दरम्यान सरकारने बैठक लावण्यासाठी मागितलेली मुदत संपली आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आता लवकरच मुंबईत आंदोलन होणार असून राज्यभरातला शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला आहे.