* दहा वर्षाची गिर्यारोहक सिद्धी सोनोनेचा राजर्षी शाहू मल्टिस्टेटकडून गौरव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी चिमुकली गिर्यारोहक सिद्धी सोनोने हिच्या जिद्दीला सलाम करीत तिचा गौरव केला. राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या मुख्यालयी हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारी सिद्धी विठ्ठल सोनोने हिचे यश जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. खेळण्या, बागडण्याच्या वयात सिद्धीने दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि ध्येयपूर्तीसाठीची मेहनत अत्यंत प्रेरणादायी आहे. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे बुलढाणा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर देशातील अनेक मुला-मुलींसाठी सिद्धी प्रेरणास्थान बनली आहे. यानिमित्ताने तिचा गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी सिद्धीचे अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच तिच्या आगामी शैक्षणिक, क्रीडा व गिर्यारोहण क्षेत्रातील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य व मदत करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील प्रतिभावान व जिद्दी मुलांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची नवी शिखरे गाठू शकतात, याचे सिद्धी हे उत्तम उदाहरण आहे, असे मत मालतीताई शेळके यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनुने, तुषार दोडिया, संजयकाका बाहेकर, व्ही. आर. चव्हाण, रघुनाथ जाधव, संतोषराव शेळके यांची उपस्थिती होती.
