* दिलीप एडतकर यांचा राजीनामा नामंजूर
अमरावती : (एशिया मंच न्यूज )
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा धनगर समाजाचे प्रमुख नेते अॅड. दिलीप एडतकर यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा राजीनामा नामंजूर केल्याची माहिती पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. एडतकरांचा राजीनामा नामंजूर करणारे प्रदेश अध्यक्षांचे पत्र आज प्रदेश काँग्रेस तर्फे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर सुनील भाऊ देशमुख यांनी दिलीप एडतकर यांना सोपविले
यापूर्वी अॅड. एडतकर यांनी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला, ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर तसेच ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांना ई-मेलद्वारे राजीनामा पाठविला होता. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी आपण न मागता देण्यात आली होती, ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली असल्याचे नमूद करत यापुढे नाममात्र पदाला चिकटून राहणे शक्य नसल्याचे म्हटले होते.
दरम्यान, गुरुवारी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांनी अॅड. दिलीप एडतकर यांच्या निवासस्थानी बैठक घेत त्यांना सरचिटणीस पदाचा राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीस माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर, माजी आयएमए अध्यक्ष डॉ. बी. आर. देशमुख, माजी महापौर वंदना कंगाले, अशोक डोंगरे, युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख, डॉ. मतीन अहमद, प्रा. सिरीन, अनिला काजी, जिल्हा काँग्रेस औद्योगिक विभागाचे अध्यक्ष समीर जवंजाळ, विजय बर्वेतसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सुनील देशमुख यांनी ॲड. एडतकर यांच्या स्वाभिमानी व स्पष्टवक्ता स्वभावाचा उल्लेख करत पक्षातील त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले व प्रदेश काँग्रेस तर्फे राजीनामा नामंजूर करणारे पत्र दिलीप एडतकर यांना सोपविले. काँग्रेस नेते किशोर बोरकर यांनीही ॲड. एडतकर यांच्या कार्याचा गौरव करताना ते शाहू-फुले-आंबेडकर विचारांचे प्रखर पुरस्कर्ते असल्याचे नमूद केले. पक्षात काही नाराजी असू शकते, मात्र काँग्रेस पक्षासाठी कायमरीत्या राजकीय परिस्थितीत त्यांच्यासारख्या नेतृत्वाची काँग्रेसला गरज असल्याचे ते म्हणाले. ॲड. दिलीप एडतकर यांनी प्रदेश काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करत आभार मानले आणि पूर्वी प्रमाणे कार्य करत राहू असा निर्वाळा दिला.
