* 'नो पार्किंग झोन'मध्ये शिरकाव; 117 अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बसस्थानकांच्या दोनशे मीटर परिसरात स्थापीत 'नो पार्किंग झोन' मध्ये शिरकाव केलेल्या 117 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याने अवैध प्रवासी वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस व उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या या संयुक्त कारवाईमुळे बस स्थानकातील प्रवासी पळविणाऱ्या अवैध वाहतूकधारकांची कोंडी झाली आहे. कारवाईचा हा धडाका 15 जूनपर्यत जिल्हाभरातील बसस्थानकांच्या परिसरात चालणार आहे. या विशेष मोहिमेमुळे राज्य परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ होऊन प्रवाशांचा ओढा पुन्हा एसटी बसकडे वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अवैध प्रवासी वाहतूक वाढल्याने परिवहन महामंडळाच्या उत्पादनात सातत्याने घट होत असल्याची ओरड होत होती. बसस्थानक परिसरात खासगी वाहने उभी करून बसस्थानकातून प्रवासी घेऊन जाणेपर्यंत अवैध प्रवासी वाहतूकदारांची दादागिरी वाढली होती. यामुळे परिवहन महामंडळाच्या प्रवासी संख्येत कमालीची घट होत होती. याशिवाय प्रवाशांच्या जिवालाही धोका होत असल्याचे निदर्शनास आल्याने राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरिक्षक यांच्या आदेशान्वये अवैध वाहतूकीवर कारवाई करण्यासाठी 5 ते 15 जूनपर्यंत जिल्ह्यात पोलीस अधिक्षक नीलेश तांबे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.
या बसस्थानकांवर करडी नजर
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात कारवाईसाठी बुलढाणा विभागातंर्गत येणारे बुलढाणा, धाड, चिखली, देऊळगाव राजा, अमडापूर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, मळकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद व शेगाव या बसस्थानकांच्या २०० मीटर नो-पार्किंग क्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांच्या मदतीने चोवीस तास गस्त करडी नजर राहणार आहे.
मोहीम अधिक व्यापक होणार
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक नुकसानीस अवैध वाहतूक हाच मुख्य घटक आहे. परिवहन राज्यमंत्री तसेच मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या आदेशान्वये ही मोहीम यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात राबविली जाणार आहे. कोणत्याही परिस्थतीत बसस्थानक परिसरात अवैध प्रवासी वाहतूक खपवून घेतली जाणार नाही.
- जयंत कांडेलकर, सुरक्षा व दक्षता अधिकारी, बुलढाणा विभाग
