बौद्ध धर्म हा मनापासून मनाकडे जाणारा महामार्ग आहे - प्रा. डॉ.भदंत कौण्डिण्य

बौद्ध धर्म हा मनापासून मनाकडे जाणारा महामार्ग आहे - 
प्रा. डॉ.भदंत कौण्डिण्य 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      सब्बपापस्स अकरणं,कुशलस्स उपसम्पदा ! सचित्तपरियोदपनं, एतं बुध्दान सासनं म्हणजे वाईट टाळा, चांगले करा, मन शुद्ध ठेवा, साधेपणा आणि नैतिकता जपा. ज्याला मन समजलं, त्याला माणूस समजला, म्हणून बौद्ध धर्म हा मनापासून मनापर्यंत जाणार महामार्ग आहे, असे मत पुज्यनिय प्रा.डॉ. भदंत कौण्डिण्य यांनी सांगितले. ते १ मे २०२६ रोजी सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथील अशोक वाटिकाच्या भव्य प्रांगणात आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या त्रिविध पावनी वैशाख पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्त बोलत होते.
        यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ. कोमलताई सुकेश झंवर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे, आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त, नाशिक, स्वप्नील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यासोबतच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि यशसिध्दी सैनिक सेवा संघाच्या महार रेजिमेंट च्या सैनिकांची व रमाईच्या लेकी ग्रुप पंचशील धम्म यांनी ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर भंते प्रा. डॉ.भदंत कौण्डिण्य यांनी त्रिशरण पंचशील आणि बुध्द वंदना घेऊन संपूर्ण अशोक वाटिकेला मंत्रमुग्ध केले.     
       यावेळी स्वागत उपस्थित मान्यवरांना संविधान प्रत भेट देऊन स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ आराख यांनी करुन उपस्थित मान्यवरांचा अल्प परिचय करून दिला. यानंतर प्रा. डॉ. भदंत कौण्डिण्य यांनी बुध्दाचा मध्यम मार्ग हा सर्वोत्तम जीवन मार्ग आहे. समाधान हाच संतोष आहे. बुध्दाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण हे वैशाखी पौर्णिमा याच दिवशी झाले. हा योगायोगा आपण समजून घेतला पाहिजेत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मनातील नकारात्मक विचार दूर करुन मन नेहमी जागृत ठेवण्यावर भर दिला. बुध्दांचे सामर्थ्य हे तलवारी वर नसून ते प्रेमावर आधारित आहे आणि म्हणूनच ते जगावर राज्य करतात.असे सांगून भदंत कौण्डिण्य यांनी पुढे सांगितले की,  बुद्धांचे तत्त्वज्ञान मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे. आजच्या युगात तणाव, नैराश्य, चिंता, आणि अस्थिरता या समस्या वाढताना दिसतात. अशा परिस्थितीत सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या संकल्पना अत्यंत प्रभावी ठरतात, सजगता आणि ध्यानसाधना यामुळे मन शांत होते, विचार स्पष्ट होतात आणि व्यक्तीला आत्मिक समाधान मिळते. त्यामुळेच आजच्या आधुनिक मानसशास्त्रातही बुध्दांचा ध्यान पध्दतीला विशेष महत्त्व आहे. 
        यावेळी बुलडाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आजच्या जागतिकीकरणाच्या युगात, जिथे विविध संस्कृती, विचारप्रवाह आणि जीवनशैली एकत्र येत आहेत. तिथे सहिष्णूता, संवाद आणि परस्पर आदर या मुल्यांची आवश्यकता अधिकच वाढली आहे. बुद्धांचे तत्त्वज्ञान या सर्व मूल्यांना प्रोत्साहन देते. त्यांनी द्वेषाऐवजी मैत्री, हिंसेऐवजी अहिंसा आणि स्वार्थाऐवजी परोपकार यांचा पुरस्कार केला. त्यामुळे त्यांच्या विचारांमुळे जागतिक शांतता आणि सौहार्द निर्माण होण्यास मदत होऊ शकते, असे म्हणून ते पुढे म्हणाले की बुद्धांचे तत्त्वज्ञान जागतिक स्तरावरही प्रभावी ठरले आहे. आशियातील अनेक देशांनी त्यांच्या शिकवणीचा स्वीकार करून आपली सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था घडवली आहे. त्यांच्या विचारांची सार्वत्रिक आणि साधेपणा यामुळे ते सर्व स्तरातील लोकांना समजण्यास आणि आचरणात सोपे वाटतात.
त्यामुळे बुद्धांचे तत्त्वज्ञान हे एका विशिष्ट धर्मापुरते मर्यादित न राहता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त ठरते. यानंतर गुलाब खरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्वप्निल साबळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यानंतर कार्यक्रमाची सांगता फराळ व खिरदान वाटप करुन करण्यात आली. या कार्यक्रमासाठी बुलडाणा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध वृत्तपत्राताचे जिल्हा प्रतिनिधी व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी,  बुलडाणा अर्बन संस्थेचे कर्मचारी व सहकार विद्या मंदिर चे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना बुलडाणा अर्बन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी सांगितले की, सध्या जगाला बुद्ध तत्वज्ञानची गरज आहे. जेव्हा जेव्हा जगभरातील कोणत्याही देशात युद्ध वा तणाव निर्माण होतो तेव्हा तेव्हा युद्ध नको तर बुद्ध हवा असे म्हटले जाते, आणि आताही असेच म्हटले जात आहे. युद्धामुळे प्रचंड प्रमाणात हानी होत असते. हा अनुभव जगाने अनेकदा घेतला आहे. याहीवेळी हाच अनुभव येत आहे. सहकार विद्या मंदिरच्या अशोक वाटिका येथे नऊ वर्षांपूर्वी जयपूर राजस्थान येथून ही तथागत भगवान गौतम बुद्ध यांची संगमरवरी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यावेळी श्रीलंका येथुन पाच भीक्षु यांना आणले होते. जगाला बुद्ध कळावा यामागची ही प्रमुख भावना आहे असेही चांडक यांनी सांगितले.